अधिकोषाचा बनावट ‘ई-मेल’ पत्ता बनवून ९ लाख पळवणार्यांना अटक !
मुंबई – अधिकोषाचा (बँकेचा) बनावट ‘ई-मेल’ पत्ता बनवून ग्राहकाच्या खात्यातून ९ लाख रुपये पळवणार्या दोघांना समतानगर सायबरसेल पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. विवेक सुनील सभरवाल आणि बिरेनभाई शांतीलाल पटेल अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून ६९ सहस्र रुपये, ९ भ्रमणभाष आणि सरकारी कागदपत्रे कह्यात घेण्यात आली.
एका खातेदाराने त्यांच्या खात्यातून ९ लाख रुपये कोणीतरी काढल्याची तक्रार केली. या प्रकरणाच्या पडताळणीत मालाड को-ऑपरेटिव्ह अधिकोषाचे युनियन अधिकोषात विलीनीकरण केले जात असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी संबंधित खातेदाराला संपर्क करून के.वाय.सी. अद्ययावत् (अपडेट) करण्यास सांगितले. त्यानंतर अधिकोषाच्या नावे खोटा ई-मेल पत्ता बनवून खातेदाराची कागदपत्रे मागवली. या कागदपत्रांवर आरोपींनी खातेदाराच्या भ्रमणभाष क्रमांकाच्या जागी त्यांचा भ्रमणभाष क्रमांक अद्ययावत् करून इंटरनेट बँकिंगद्वारे तक्रारदाराच्या खात्यातून ९ लाख रुपये पळवले.