चीनचे तुकडे !
संपादकीय
|
चीनमधील कम्युनिस्टांच्या (साम्यवाद्यांच्या) हुकूमशाहीमध्ये सत्ताधार्यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न करणार्यांवर कठोर कारवाई केली जाते, हे अनेक प्रसंगांमध्ये दिसून आले आहे; मात्र तरीही १४० कोटी लोकसंख्येच्या देशात असा कुणीतरी समोर येतोच आणि तो सत्ताधार्यांना त्यांच्या चुका सांगण्याचे धाडस करतो. असेच एक धाडस चीनच्या परराष्ट्र धोरणाचे सल्लागार जिया किंग्गुओ यांनी केले आहे. आता त्यांच्यावर काय कारवाई होते, हे पहावे लागणार आहे; कारण त्यांनी मांडलेली सूत्रे अतिशय गंभीर आहेत आणि चीनच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी आहेत. जिया यांनी थेट राष्ट्रपती शी जिनपिंग यांना लक्ष्य केले आहे. अशी सूत्रे अमानुष चिनी सत्ताधार्यांच्या पचनी पडण्याची शक्यता अगदीच अल्प दिसत आहे. हाँगकाँग येथील ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या दैनिकात जिया यांचा एक विस्तृत लेख अहवाल स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘चीनकडून सैन्यावर सध्या होणारा खर्च पहाता तो चीनचे सोव्हिएत संघाप्रमाणे तुकडे होण्यास कारणीभूत ठरू शकतो. शस्त्रांवर मोठ्या प्रमाणात होणार्या खर्चातून लाभ मात्र पुष्कळ अल्प मिळणार आहे. चीनच्या मोठ्या शाळांमध्ये सोव्हिएत संघाचे ज्या चुकांमुळे तुकडे झाले, त्या चुका चीनकडून होऊ नयेत, यासाठी धडा शिकवण्यात येत असतो. चीनच्या अनेक नेत्यांनी हा धडा नेहमीच लक्षात घेण्याची आवश्यकता आहे’, याची आठवण जिया यांनी त्यांच्या लेखात करून दिली आहे. प्रचंड शस्त्रसज्जता करून जगाला स्वतःच्या अधिपत्याखाली आणण्याची मोठी महत्त्वाकांक्षा चीनच्या कम्युनिस्ट सत्ताधार्यांकडून बाळगली जात आहे. चीनला अमेरिकेवर मात करुन महासत्ता बनायचे आहे, हे लपून राहिलेले नाही. दोन्ही देशांमधील स्थिती शीतयुद्धाच्या पलीकडे गेली आहे. या दोघांमध्ये कोणत्याही कारणावरून कधीही युद्ध होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी स्थिती आहे. मग तो तैवानचा प्रश्न असू दे कि दक्षिण चीन सागरामधील वर्चस्वाचा प्रश्न असू दे. कोणत्याही कारणाने ही शक्यता दिसून येत आहे. ‘बाहेरून चीनने कितीही शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला, शस्त्रास्त्रे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी अंतर्गत स्थिती पहाता चीन दिवसेंदिवस दुबळा होत चालला आहे’, असेच जिया यांना सांगायचे आहे. शस्त्रांच्या स्पर्धेमध्ये चीनच्या सत्ताधार्यांकडून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांना साम्यवादाच्या नावाखाली वेठबिगारासारखे राबवून घेतले जात आहे. ‘जे सोव्हिएत संघामध्ये झाले, तेच चीनमध्ये होत आहे’, हे जिया यांना दिसत असल्यानेच त्यांनी सरकारला सतर्क केले आहे; मात्र साम्यवादी हुकूमशाही शासनकर्ते त्यांच्या या राष्ट्रवादी भूमिकेकडे पहाण्याची शक्यता त्यांच्याविषयीच्या पूर्वानुभवामुळे अल्पच वाटते. जिया यांनी सोव्हिएत संघाचे तुकडे का झाले ? याच्या अभ्यासाचीही आठवण करून दिल्याने तरी शासनकर्ते त्याकडे गांभीर्याने पहातील, अशी ते अपेक्षा करत असतील. जिया यांनी मांडलेल्या सूत्रांच्या आधीच काही राजकीय तज्ञांनी चीनमधील मंदी, खालावलेली अर्थव्यवस्था यांकडे बोट दाखवलेले आहे. भविष्यात आर्थिक प्रश्नांमुळेच चीनमध्ये अराजक निर्माण होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
चीनकडून युद्धाची शक्यता !
सोव्हिएत संघामध्येही साम्यवादाचा अतिरेक झाल्याने त्या वेळचे राष्ट्रपती गोर्बाचेव्ह यांनी सूज्ञपणा दाखवत देशात खासगीकरणाचे धोरण घोषित केले. यातूनच पुढे रशियाचे तुकडे होऊन अनेक देश निर्माण झाले. रशियामधील साम्यवाद जेमतेम ८० वर्षे टिकला, चीनमध्येही साम्यवादाला ७० वर्षे झाली आहे. त्यामुळे तेथील साम्यवादही येत्या काही वर्षांत गळून पडला, तर आश्चर्य वाटू नये; मात्र रशियात ज्याप्रमाणे काही ठिकाणी अंतर्गत बंडाळी होऊन तुकडे झाले, तसे चीनच्या संदर्भात होईल कि चीन शत्रू देशांवर, उदा. भारत, तैवान, जपान, अमेरिका यांवर आक्रमण करून आत्मघात करून घेईल, हे येणारा काळच सांगू शकतो. रशियाच्या तुलनेत चिनी शासनकर्त्यांची मानसिकता पहाता ते आततायी कृत्य करण्याची शक्यता अधिक वाटते. युद्ध करून चिनी नागरिकांना राष्ट्रवादाच्या नावाखाली, तरी एकत्र ठेवता येऊ शकते का ?, याची चाचपणी चिनी शासनकर्ते करू शकतील, हे नाकारता येत नाही. जर असे झाले, तर तिसरे महायुद्ध होईल आणि ते संपूर्ण जगासाठीच विनाशकारी ठरू शकेल. जर चीनमध्ये युद्ध करण्यापूर्वीच किंवा त्याने तसा निर्णय घेण्यापूर्वीच अंतर्गत अराजक निर्माण झाले, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर, तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठा परिणाम होऊ शकतो. आज चीनने जगभरात त्याचे तंत्रज्ञानाच्या माध्यमांतून जे प्रस्थ निर्माण केले आहे, ते सर्व कोलमडून पडू शकते. चीनने अनेक देशांना अब्जावधी रुपयांचे कर्ज दिले आहे, हे मिळवण्यासाठी जी शक्ती लागते, ती क्षीण झाल्यास हे पैसे परत मिळण्याची शक्यताही अल्प होऊ शकते. तसेच जगभरात त्याचे जे काही प्रकल्प चालू आहेत, तेही ठप्प होतील. चीनच्या या स्थितीचा लाभ भारतासह दक्षिण चीन सागरातील सर्वच देश, तसेच अमेरिकेलाही होणार आहे, हे वेगळे सांगायला नको.
पाकचेही तुकडे शक्य !
चीनप्रमाणे पाकचेही तुकडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकमधील सिंध प्रांतामध्ये गेल्या अनेक दशकांपासून स्वतंत्र होण्याची चळवळ चालू आहे. अल्ताफ हुसेन यांची ‘मुत्ताहिद कौमी मूव्हमेंट’ यासाठी गेल्या अनेक दशकांपासून प्रयत्नरत आहे. स्वतंत्र ‘सिंधदेश’ निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. त्या वेळी पाकच्या सैन्याने बळकावलेल्या बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्य चळवळ चालूच आहे. तेथे सशस्त्र लढा देण्यात येत आहे. खैबर पख्तुनख्वा हा प्रांतही स्वतंत्र होण्याची मागणी करत आहे. पाकची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने म्हणजेच पाक कधीही दिवाळखोर देश होण्याच्या शक्यतेने पाकचे वरील प्रांत स्वतंत्र होण्याची शक्यता आहे. चीनप्रमाणेच पाक सैन्यही सैन्यावर प्रचंड खर्च करत असल्याने सामान्य लोकांना जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे आणि त्याचाच परिणाम त्याचे तुकडे होण्यावर होईल. चीन आणि पाक यांचे तुकडे भारताच्या पथ्यावर पडणार आहेत, हे मात्र नक्कीच !