स्वतःच्या आचरणातून सर्वांसमोर आदर्श ठेवणारी एकमेवाद्वितीय गुरुमाऊली !
१. परात्पर गुरु पदावर आरूढ असतांनाही ‘ज्येष्ठांचा सन्मान कसा करायचा ?’, याचा आदर्श स्वतःच्या कृतीतून ठेवणारी एकमेवाद्वितीय गुरुमाऊली !
‘सद्गुरु अप्पाकाका (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू (सद्गुरु (कै.) डॉ. वसंत आठवले)) प्रथमच रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले असतांना मी त्यांच्या समवेत ग्रंथांची अनुक्रमणिका करण्याची सेवा करत होते. सद्गुरु अप्पाकाका मुंबईला परत जातांना त्यांना निरोप देण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्या खोलीत आले. सद्गुरु अप्पाकाका वयाने आणि ज्ञानाने मोठे होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांची प्राणशक्ती अल्प असतांनाही त्यांनी सद्गुरु अप्पाकाकांना ज्येष्ठ बंधू या नात्याने वाकून नमस्कार केला. या प्रसंगातून त्यांनी ‘आपण कितीही मोठे झालो, तरी गुरुजन आणि वडीलधारी व्यक्तींचा मान ठेवावा, त्यांचा आदर करावा’, हे कृतीतून शिकवले.
२. सदैव शिष्यभावात राहून साधकांना कृतीतून मार्गदर्शन करणारे परात्पर गुरु डॉक्टर !
एकदा परात्पर गुरु डॉक्टर बाहेरील वापरायच्या त्यांच्या चपला हातात घेऊन भिंतीला धरून चालत येत होते. मी लांबून पाहिल्यावर जवळ जाऊन त्यांना म्हणाले, ‘‘मी चपला खोलीत नेऊन ठेवते.’’ त्या वेळी ते म्हणाले, ‘‘मी अजून ही सेवा करू शकतो. मी म्हातारा होईन, तेव्हा तू कर.’’ ते गुरुभावात न रहाता ‘मी गुरूंच्या आश्रमात रहातो, तर मीही शिष्यच आहे’, या भावाने ते आश्रमात रहातात. त्यामुळे ते करू शकणार्या सर्व गोष्टी स्वतः करतात.
३. परात्पर गुरु डॉक्टर सत्संग संपल्यावर खोलीबाहेर पडतांना इतरांना पाठ दिसणार नाही, याची काळजी घेतात !
परात्पर गुरु डॉक्टर सत्संग संपल्यानंतर त्यांच्या खोलीत जातांना ते साधकांशी बोलत बोलत बाहेर येतात. बाहेर जातांना ‘ते सत्संगाला बसलेल्यांकडे त्यांची पाठ होणार नाही’, याची काळजी घेतात. मला हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि आध्यात्मिक स्तरावर वाटले. ‘देवाने भक्तांना पाठ दाखवली’, असा विचार मनात आला, तरी ‘प्राण निघून गेल्यासारखे होईल’, असे मला वाटते. त्यामुळेच ‘परात्पर गुरु डॉक्टर पाठ न दाखवता जात असतील’, असे वाटले.
४. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती !
४ अ. ‘माझे गुरु कोण ?’ या मनातील प्रश्नाचे उत्तर गुरुमाऊलीने अनुभूतीतून देणे : मुंबई येथील साधक श्री. अनिल जठारकाका हे सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन करण्यासाठी धाराशिव येथे आले होते. तेव्हा मी नुकतेच सनातन संस्थेच्या संपर्कात आले होते. सत्संगात काका गुरूंचे महत्त्व सांगायचे. त्या वेळी माझ्या मनात ‘ही माहिती बरोबर आहे; पण माझे गुरु कोण ? सत्संगातील मार्गदर्शक कि त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे गुरु ?’, असा प्रश्न येत असे. सत्संगात मी नवीन असल्याने त्यांच्याशी काहीच बोलले नव्हते.
पहिल्या गुरुपौर्णिमेला मी पूजेची सिद्धता करण्याच्या सेवेत होते. मी पूजेची सर्व मांडणी केली. पूजेसाठी ठेवण्यात आलेले छायाचित्र ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे आहे’, असे मला वाटत होते आणि तसे मी इतरांनाही सांगत होते. प्रत्यक्षात ते छायाचित्र ‘प.पू. भक्तराज महाराज यांचे आहे’, असे सर्वजण मला सांगत होते. तरीही मला त्या छायाचित्राकडे पाहिल्यावर ते ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे आहे’ असेच दिसत होते.
पुढील वर्षीच्या गुरुपौर्णिमेला पूजेसाठी छायाचित्र घेतांना मी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचेच घेतले. त्या वेळी सर्व साधक मला म्हणाले, ‘‘गुरुपौर्णिमा सोहळ्यात आपण प.पू. भक्तराज महाराज यांचेच छायाचित्र ठेवतो.’’ त्या वेळी मी त्यांना आत्मविश्वासाने सांगत होते की, गेल्या वर्षी आपण परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे छायाचित्र ठेवले होते. सगळ्यांनी मला ‘तुला तसा भास झाला असेल’, असे सांगितल्यावर मी पूजास्थळी प.पू भक्तराज महाराज यांचे छायाचित्र ठेवले. या अनुभूतीतून परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या मनातील ‘माझे गुरु कोण ?’ या शंकेचे निरसन केले.
४ आ. परात्पर गुरु डॉक्टरांना सूक्ष्मातून अनुभवणे : मी साधनेत येऊन ५ वर्षे झाली, तरी मला परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन झाले नव्हते; परंतु मी त्यांना मनातील सर्वकाही सांगत असे. त्यामुळे ‘ते सतत माझ्या समवेत आहेत’, असे मला वाटायचे. छायाचित्रांच्या साठ्यात परात्पर गुरु डॉक्टरांची जुनी छायाचित्रे असायची. ती छायाचित्रे पाहून ‘मी यांच्याशी बोलत आहे’, असे मला वाटायचे नाही. काही दिवसांनी परात्पर गुरु डॉक्टरांची नवीन छायाचित्रे साठ्यात आली. ती पाहिल्यावर मला फार आनंद झाला. ‘ज्यांच्याशी मी बोलते, ते हेच आहेत’, याचा मला आनंद झाला.
४ इ. परात्पर गुरु डॉक्टरांशी सूक्ष्मातून बोलणे : नामजपादी उपायांच्या वेळी, मी नामजप करत प्रदक्षिणा घालण्याऐवजी कधी कधी परात्पर गुरु डॉक्टरांशी बोलायचे. त्या वेळी ‘तेही माझ्याशी बोलत आहेत’, असे मला जाणवायचे. परात्पर गुरु डॉक्टर माझ्या बोलण्यावर विनोद करून हसवायचे. प्रत्यक्षात मी रामनाथी आश्रमात आल्यावर त्यांच्या बोलण्यातील सहजता मला अनुभवता आली.
५. प्रार्थना
‘हे गुरुमाऊली, तुम्ही माझ्यावर केलेली प्रीती, मला शिकवलेली सूत्रे, माझ्यावर केलेले साधनेचे संस्कार आणि मी अनुभवलेले अनमोल भावमोती मला शब्दबद्ध करता येऊ देत. माझी कोणतीही पात्रता नसतांना तुम्ही मला सर्वकाही दिले, त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्ही जे काही शिकवले, ते सर्व आपल्या सुकोमल चरणी अर्पण.’
– सौ. साक्षी नागेश जोशी (ताकभाते), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’.
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |