हिंदु जनजागृती समितीचे राज्यव्यापी ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ अभियान !
|
हिंदु जनजागृती समितीकडून प्रतिवर्षी भारताच्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी जनजागृती अभियान राबवले जाते. पश्चिम महाराष्ट्रात या अभियानांतर्गत घडलेल्या घडामोडी येथे देत आहोत.
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विविध महाविद्यालयांत निवेदन !
तुमच्यासारखे युवक या कार्यात आहेत, हे पाहून पुष्कळ चांगले वाटले ! – ‘श्री नाकोडा हिंदी विद्यामंदिर एवं हायस्कूल’मधील शिक्षकांची प्रतिक्रिया
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), २४ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा अभियानाच्या अंतर्गत इचलकरंजी येथे १२ महाविद्यालयांत निवेदन देण्यात आले. ‘श्री नाकोडा हिंदी विद्यामंदिर एवं हायस्कूल’ येथे निवेदन दिल्यावर तेथील शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘तुमच्यासारखे युवक या कार्यात आहेत, हे पाहून पुष्कळ चांगले वाटले. यापुढे असे कोणतेही विषय असतील, तर जरूर या. कोरोना संसर्गाच्या नियमांमुळे सध्या विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्प आहे. पुढील वेळी वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याची संधी देऊ’, असे मत व्यक्त केले.
गोविंदराव हायस्कूल येथे निवेदन दिल्यावर मुख्याध्यापक श्री. एस्.एस्. चिंचिसाडे यांनी ‘‘तुमचे निवेदन फलकावर लावू आणि ‘व्हॉट्सॲप’ गटात पाठवू, असे आश्वासन दिले.’’ या उपक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या कु. महिमा काब्रा, तसेच धर्मप्रेमी कु. नेहा पाटील, कु. साक्षी हैडा, कु. सेजल छाजेड, कु. लब्धि छाजेड या सहभागी झाल्या होत्या.
जिल्ह्यातील अन्य घडामोडी
१. शाहूवाडी येथील पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
२. गडहिंग्लज येथे स्वरक्षण प्रशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी युवतींनी फलकलिखाण केले, तसेच २ शाळा-महाविद्यालयांत निवेदन दिले.
कर्नाटकातील सौंदलगा, कोगनोळी येथील १० शाळांमध्ये निवेदन देण्यात आले. या उपक्रमात धर्मप्रेमी शिवानी जाधव, करुणा चव्हाण, तृप्ती यादव, सर्वश्री दशरथ डोंगळे, हृषिकेश पाटील, सुशांत पाटील, हिंदु जनजागृती समितीचे संतोष सणगर सहभागी झाले होते. |
५० निवेदने देण्यात धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग ! हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, स्वरक्षण वर्गातील प्रशिक्षक, तसेच धर्मप्रेमी यांनी एकूण ५० ठिकाणी निवेदन दिले. निवेदन देण्यात धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग होता. गडहिंग्लज, इचलकरंजी, कागल, कबनूर, शिरोली, मत्तीवडे, कोगनोळी, सांगवडे, हालसवडे, वसगडे, पट्टणकोडोली, सांगवडेवाडी येथे प्रशासन, शाळा, तसेच अन्य ठिकाणी निवेदने दिली. |
कोल्हापूर
चंदगड येथे तहसील कार्यालयात उपलेखापाल विलास पाटील यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. वामन बिलावर, श्री. व्यंकटेश अशोक बिलावर, सौ. मालती पेडणेकर, सौ. सुधा बिलावर उपस्थित होत्या.
सांगली येथे शाळा-महाविद्यालये आणि प्रशासन यांचा सकारात्मक प्रतिसाद !
सांगली, २४ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीकडून सांगली जिल्ह्यात विविध शाळा-महाविद्यालये आणि प्रशासन यांना निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी शाळा-महाविद्यालये आणि प्रशासन यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. निवेदन देतांना विविध सामाजिक संघटनात काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते, धर्मप्रेमी सहभागी झाले होते.
१. विटा येथे नायब तहसीलदार सचिन खांडेकर यांना तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी सांगली जिल्हा नाभिक संघटना अध्यक्ष श्री. भीमराव काशीद, तसेच सिंहसेना संघटना महाराष्ट्र महिलाप्रमुख सौ. पुष्पाताई मोहन बोबडे उपस्थित होत्या.
विटा येथे सौ. बिंदुताई मुंकदराव महामुनी प्राथमिक मराठी शाळा, रमाबाई रानडे इंग्लिश मिडियम स्कूल यांसह अन्य शाळांमध्ये निवेदन देण्यात आले.
२. बत्तीसशिराळा येथे धर्मप्रेमी श्री. अशोक म्हसकर आणि त्यांची मुलगी कु. पल्लवी म्हसकर यांनी पुढाकार घेऊन बत्तीसशिराळा येथील पोलीस ठाण्यात निवेदन दिले.
३. जत येथे पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक कोळेकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदन दिल्यावर पोलीस उपनिरीक्षक म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यपूर्व काळात शिरीषकुमार यांच्यासारख्या अनेक बालक्रांतीकारकांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे अत्यावश्यक आहे. हिंदु जनजागृती समिती अत्यंत स्तुत्य कार्य करत असून या संदर्भात जी जी कारवाई अपेक्षित आहे, ती ती आम्ही करू.’’
जत येथील ‘रामराव विद्यामंदिर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज’ येथे निवेदन देण्यात आले. या वेळी तेथील शिक्षकांनी फलकावर निवेदन लावू, असे आश्वासन दिले.
४. सांगली शहरात ‘सांगली हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज’चे मुख्याध्यापक विद्याधर बाळगोंडा पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक करून ‘आम्ही सर्व विद्यार्थ्यांचे प्रबोधन करू आणि निवेदन काचफलकात लावू’, असे आश्वासन दिले. गरवारे महाविद्यालयातही निवेदन देण्यात आले.
५. जिल्ह्यात अनेक फलकांद्वारे लिखाण करून अनेक राष्ट्रप्रेमींपर्यंत हा विषय पोचवण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यात अभियानास प्रसिद्धीमाध्यमांकडून चांगल्या प्रकारे प्रसिद्धी !
‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ अभियानास कोल्हापूर जिल्ह्यात प्रसिद्धी माध्यमांकडून चांगल्या प्रकारे प्रसिद्धी मिळाली. हुपरी येथे धर्मप्रेमी श्री. नितीन काकडे यांच्या प्रयत्नांतून स्थानिक दैनिकात, तसेच ‘वेब पोर्टल’वर चांगल्याप्रकारे प्रसिद्धी मिळाली. गडहिंग्लज, तसेच कोल्हापूर शहरातही दैनिक ‘पुढारी’, दैनिक ‘तरुण भारत’ यांसह अन्यांनी चांगली प्रसिद्धी दिली. स्थानिक वृत्तवाहिनी ‘बी न्यूज’ यांनीही निवेदनाच्या वृत्तास चांगली प्रसिद्धी दिली.
सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी निवेदने दिली !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रजासत्ताकदिनानिमित्त सातारा, कराड, वाई आणि वडूज येथे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका आणि प्राचार्य, तसेच प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सातारा उपनगरातील क्षेत्रमाहुली जिल्हा परिषद शाळा, संगमनगर पोलीस ठाणे, संगम माहुली ग्रामपंचायत, क्षेत्र माहुली येथील श्रीराम विद्यालय आणि महागाव ग्रामपंचायतीमध्ये, तर सातारा शहरातील श्री भवानी विद्यामंदिर, महर्षी कर्वे विद्यामंदिर (कन्या शाळा), न्यू इंग्लिश स्कूल, नवीन मराठी शाळा, महर्षी कर्वे उच्च माध्यमिक महाविद्यालय, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय आदी ठिकाणी अभियानाच्या अंतर्गत प्रबोधन करण्यात आले.
१. रहिमतपूर येथील नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या वतीने नगररचना साहाय्यक शरद बर्गे यांना, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मेघा गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सौ. मनिषा माने, सौ. शारदा टिकोले आदी उपस्थित होते.
२. कोरेगाव येथील सरस्वती विद्यालयात मुख्याध्यापक संतोष भातखंडे यांना, ‘कांतीलाल वीरदंच भंडारी’ विद्यालयात मुख्याध्यापिका सौ. वीरकर यांना आणि ‘सरस्वती इंग्लिश मिडियम स्कूल’ येथील मुख्याध्यापिका सौ. लिना जाधव यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सौ. रत्ना जाधव, सौ. वंदना काळे उपस्थित होत्या.
३. वाई येथे प्रांताधिकारी श्री. पवार यांना आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री सचिन वाघोले, अरुण दुबे, प्रतीक मतकर, श्रीमती स्मिता भोज, सौ. वनारसे, श्रीमती सकुंडे, सौ. योगिता शिंदे आदी उपस्थित होते.
४. वडूज येथे तहसीलदार यांच्या नावे नायब तहसीलदार श्री. जाधव यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. विनायक ठिगळे, सौ. कोकाटे, सौ. कुंभार आदी उपस्थित होते.
५. कराड येथे तहसीलदार यांच्या नावे अव्वल लिपिक रमेश सपकाळ यांना, तर शहर पोलीस निरीक्षक बी.आर्. पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री मदन सावंत, अनिल कडणे, चिंतामण पारखे, लक्ष्मण पवार, अरुण पाटील आदी उपस्थित होते.
पुणे येथे पोलीस, प्रशासन, शाळा आणि महाविद्यालय यांना निवेदन !
पुणे, २४ जानेवारी (वार्ता.) – प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विशेष कार्यकारी दंडाधिकारी श्री. धनंजय जाधव आणि सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. एस्. घोलप यांना निवेदन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि समिती घेत असलेल्या ऑनलाईन धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी उपस्थित होते.
सिंहगड रस्ता येथील कै. चंद्रकांत दांगट पाटील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. पाटील, तसेच कै. चंद्रकांत दांगट पाटील जुनियर कॉलेज आणि रॉयल रोजेस इंग्रजी माध्यम शाळा यांचे मुख्याध्यापक श्री. चिरंजीवी दांगट पाटील यांना हिंदु जनजागृती समितीच्या सौ. आरती कांडलकर आणि सौ. पूनम होमकर यांनी निवेदन दिले.
सासवड येथील ‘स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थे’च्या कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. उषाताई सुळगेकर यांनाही निवेदन दिले. या वेळी धर्मशिक्षणवर्गात सहभागी होणार्या महिला धर्मप्रेमी सौ. माई परांडेकर, सौ. शिल्पा पवार आणि सौ. सीमा देशमुख, तसेच श्री विनायक परांडेकर आणि समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. ‘कोरोना महामारीचा संकटकाळ नसता, तर ३ वर्षांपूर्वी जसे समितीचे व्याख्यान आणि क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन यांचे आयोजन केले होते, तसे आम्ही आयोजित केले असते. आपल्या निवेदनातील विषय विद्यार्थी आणि पालक यांच्यापर्यंत पोचवू’, असे आश्वासन कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. उषाताई सुळगेकर यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाकडून समितीच्या कार्याचे कौतुक आणि पाठिंबा !
कोल्हापूर – हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनाची नोंद घेत प्राथमिक शिक्षण विभागाने सर्व गटशिक्षणाधिकारी यांना प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचे निर्देश दिले. त्या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. गुरुराज हिरेमठ यांनी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांना ‘व्हॉट्सॲप’वर पाठवलेला अभिप्राय !
राष्ट्रध्वजाच्या संदर्भात समिती राबवत असलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य ! – श्री. गुरुराज हिरेमठ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष
‘आपण करत असलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे आणि राष्ट्रीय प्रतिकांचा आदर राखणे हे प्रत्येक नागरिकाचे परमकर्तव्य आहे, याची जाणीव करून देणारा आहे. समितीने केलेल्या निवेदनात उल्लेख केलेली सर्व सूत्रे, तसेच संविधानातील कायद्याच्या कलमांचा घेतलेला आधार हासुद्धा अतिशय अभ्यासपूर्ण आहे. आपण पुष्कळ चांगले कार्य करत आहात आणि असेच राष्ट्रहिताच्या अन् राष्ट्रभावना जागृत करणारे उपक्रम व्हावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना अन् आपल्या भावी राष्ट्रीय कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!’