कोरोना महामारीच्या काळात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत दैवी दौर्यावर असलेल्या साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा !
१. महर्षींच्या आज्ञेने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि दैवी दौर्यातील सर्व साधक रामनाथी आश्रमात पोचणे अन् त्यानंतर संपूर्ण भारतात दळणवळण बंदी चालू होणे
‘फेब्रुवारी २०२० पासून भारतात कोरोना महामारीचे संकट चालू झाले. त्या काळात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा दैवी प्रवास नेहमीप्रमाणे चालू होता. १८.३.२०२० या दिवशी महर्षींच्या आज्ञेने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि दैवी दौर्यातील सर्व साधक रामनाथी गोवा येथील सनातनच्या आश्रमात पोचले अन् २२.३.२०२० या दिवसापासून संपूर्ण भारतात दळणवळण बंदी लागू झाली. त्यानंतर ३ मास आम्ही आश्रमात राहून सेवा करत होतो.
२. महर्षींच्या आज्ञेनुसार राज्यातील दळणवळण बंदीचे नियम पाळून दैवी दौर्याला जाणे आणि त्या कालावधीत अनुभवायला मिळालेले क्षण अविस्मरणीय असणे
महर्षींकडून ‘पुन्हा दौर्याला जायचे आहे’, असा निरोप आला. त्यामुळे ३.६.२०२० या दिवशी आमचे पुन्हा दौर्यावर जाण्याचे नियोजन झाले. ‘काही राज्यांमध्ये दळणवळण बंदीच्या नियमांत सवलत आहे’, असे लक्षात आल्यावर आम्ही त्या राज्यांतील नियमांप्रमाणे दैवी दौरा चालू केला.
३. ‘सर्व ईश्वरेच्छेने घडते !’, हे प्रत्यक्षात अनुभवता येणे
आम्हा सर्वांना ‘सर्व ईश्वरेच्छेने घडते !’, याची अनुभूतीही घेता आली. ‘खरोखर गुरुकृपा म्हणजे काय !’, याची प्रत्यक्ष अनुभूती देणारे क्षण पुढीलप्रमाणे आहेत.
३ अ. अयोध्या येथे गेल्यावर लक्षात आलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
३ अ १. महर्षींच्या आज्ञेने रामजन्मभूमी येथे तेथील भूमीपूजनाच्या आधी जाण्याची संधी मिळणे आणि कोरोना महामारीचा काळ असूनही नदीच्या घाटावर जाता येणे : आम्ही कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून उत्तर भारतात गेलो. त्या ठिकाणी आम्हाला महर्षींच्या आज्ञेने रामजन्मभूमी येथे तेथील भूमीपूजनाच्या आधी जाण्याची संधी मिळाली. त्या वेळी कोरोना महामारीचा काळ असूनही आम्हाला ‘शरयू’ नदीच्या घाटावर जाता आले. शरयू नदीच्या घाटावर आरतीच्या वेळी प्रचंड गर्दी होती; परंतु काही जणांनी ‘मास्क’ लावलेला नव्हता. अशा स्थितीत आम्ही सगळ्या नियमांचे पालन करून काळजी घेत होतो.
३ अ २. अयोध्या येथे आलेल्या बर्याच लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समजणे आणि देवाच्या कृपेने अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चैतन्याच्या कवचामुळेच साधक तेथून सुखरूपपणे बाहेर पडणे : त्या गर्दीत आम्हाला तेथील ‘चित्रीकरण करणे आणि छायाचित्र काढणे’, अशा सेवा करायच्या होत्या. अशा वेळी ‘केवळ देवच आमची काळजी घेऊ शकतो’, याचीच तेथे अनुभूती आली. त्या ठिकाणी बाहेरच्या लोकांची पुष्कळ गर्दी होती आणि कोणीही नियमांचे पालन करत नव्हते. काही दिवसांनी आम्हाला समजले, ‘अयोध्या येथे आलेल्या बर्याच लोकांना कोरोनाची लागण झाली.’ देवाची कृपा आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चैतन्याचे कवच यांमुळे आम्ही तेथून सुखरूपपणे बाहेर पडलो.
३ आ. अयोध्येत एका संतांना भेटायला जाण्याचे नियोजन होणे; पण श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी कोरोनाचे संकट आधीच जाणल्याने त्यांनी साधकांना ‘त्या संतांना नंतर भेटूया’, असे सांगणे : आम्ही अयोध्येतील भूमीपूजनाच्या निमित्ताने श्रीराममंदिर न्यासाच्या पदाधिकार्यांना भेटायला गेलो. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी त्यांना कैलास-मानससरोवर येथील माती आणि जल भूमीपूजनासाठी अर्पण केले. यानंतर ‘अयोध्येतील काही संतांना भेटूया’, असे नियोजन झाले. दुसर्या दिवशी आम्ही रामजन्मभूमीचे दर्शन घेतले. त्यानंतर ‘एका संतांना भेटूया’, असा विचार झाला. ते संत रामजन्मभूमी न्यासाशी निगडित होते. तितक्यात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ म्हणाल्या, ‘‘त्यांना आज भेटायला नको’, असे मला वाटत आहे. दुसर्या सेवा आहेत, त्या आपण पूर्ण करूया आणि नंतर वेळ मिळाल्यास त्यांना भेटूया.’’ त्यामुळे आम्ही तेथे जाण्याचे रहित केले.
दोन दिवसांनी आम्हाला समजले, ‘ज्या संतांना आम्ही भेटायचा विचार करत होतो, त्यांना कोरोना झाला आहे आणि त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.’ तेव्हा जीवनातील गुरूंचे महत्त्व आमच्या लक्षात आले. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ त्या ठिकाणी नसत्या, तर आम्ही नक्कीच त्या संतांना भेटायला गेलो असतो. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ते संकट आधीच जाणून आम्हाला कोरोनाच्या संकटापासून दूर ठेवले.
३ इ. जयपूर (राजस्थान) येथे गुरूंनी त्यांच्या सर्वज्ञतेची दिलेली प्रचीती !
अयोध्येतील सर्व सेवा आटपून आम्ही जयपूर (राजस्थान) येथे आलो. त्या ठिकाणी आम्हाला बर्याच सेवा होत्या आणि संपर्क करायचे होते. त्या वेळी त्या सेवा करणेही महत्त्वाचे होते आणि कोरोनाचे संकटही होते. अशाच एका प्रसंगात गुरूंनी त्यांच्या सर्वज्ञतेची अनुभूती दिली.
३ इ १. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी साधकांना एका दुकानदाराकडे न जाण्यासाठी सतर्क करणे, त्या दुकानातील बर्याच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे काही मासांनी समजणे आणि ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे साधकांकडे किती बारकाईने लक्ष असते !’, हे लक्षात येणे : आम्ही जयपूर येथील एक व्यापार्याकडे गेलो होतो. आम्ही त्या ठिकाणी पोचताचक्षणी आम्हाला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा भ्रमणभाष आला. त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘त्या ठिकाणी जाऊ नका. त्या ठिकाणी कोरोनाची लागण झालेली व्यक्ती त्या दुकानदाराला भेटायला आल्याचे मला सूक्ष्मातून दिसत आहे. तुम्ही आता त्या दुकानात न जाता परत गाडीत बसा आणि भ्रमणभाषवर श्रीविष्णुसहस्रनाम ऐका. त्या ठिकाणी १५ ते २० मिनिटांनी जा, म्हणजे तोपर्यंत ती लागण झालेली व्यक्ती निघून जाईल.’’ आम्ही श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे केले. काही मासांनी आम्हाला त्या दुकानदाराशी बोलतांना समजले, ‘त्यांच्या दुकानातील बर्याच जणांना त्या वेळी कोरोनाची लागण झाली होती’; मात्र श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या कृपेने आम्हाला काही झाले नाही. ज्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी आम्हाला त्या दुकानदाराकडे न जाण्यासाठी सतर्क केले, तेव्हा त्या झोपल्या होत्या. त्यांनी झोपेतून मध्येच उठून आम्हाला भ्रमणभाष केला होता. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे आम्हा साधकांकडे किती बारकाईने लक्ष असते !’, हे आम्हाला समजले.
३ इ २. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी साधकांना बाहेर गेल्यावर ‘भ्रमणभाषवर कोरोनाविरुद्ध आध्यात्मिक बळ वाढण्यासाठी दिलेला जप लावा आणि समवेत विभूती घेऊन जा’, असे सांगणे : यानंतर आमची जयपूर येथे अनुमाने २० दिवस सेवा चालू होती. त्या २० दिवसांत आम्ही प्रतिदिन ३ – ४ ठिकाणी जायचो आणि अनेक जणांना भेटायचो. आम्ही ज्यांना भेटायचो, त्या ठिकाणी लोकांची बरीच गर्दी असायची. प्रत्येक वेळी आम्ही बाहेर पडतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आम्हाला सांगायच्या, ‘‘देवाला प्रार्थना करून जा. समवेत विभूती ठेवा. भ्रमणभाषवर कोरोनाविरुद्ध आध्यात्मिक बळ वाढण्यासाठी दिलेला जप लावा आणि सगळी काळजी घ्या.’’ त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रतिदिन करत होतो. त्या काळात एक गोष्ट लक्षात आली, ‘आम्ही कधीही बाहेर पडलो, तरी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आमच्यासाठी नामजप करायच्या.’
३ इ ३. साधक जयपूर येथून देहली येथे गेल्यावर जयपूर येथे कोरोनाचे प्रमाण वाढल्याचे समजणे; मात्र त्या ठिकाणी साधकांना कोणताही त्रास न होणे : आम्ही संध्याकाळी निवासाच्या ठिकाणी आल्यावर गरम पाण्याने अंघोळ करायचो. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ अग्निहोत्र करत असतांना आम्हाला त्या ठिकाणी बसायला सांगून अग्निहोत्रातील धूर घ्यायला सांगायच्या. आमची जयपूर येथे बाहेरच्या संपर्काची सेवा पूर्ण झाल्यावर आम्ही देहली येथे जायला निघालो. त्यानंतर १५ ते २० दिवसांनी आम्हाला समजले, ‘आम्ही जयपूर येथे ज्यांना ज्यांना भेटलो होतो, त्यांच्यापैकी बर्याच जणांना कोरोनाची लागण झाली आहे.’ आमची सेवा पूर्ण होईपर्यंत त्या लोकांना किंवा त्यांच्या कामगारांना कोरोना झाला नाही. आमची सर्व सेवा पूर्ण झाल्यावर त्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढला; मात्र आम्हाला एकदाही कोणताही त्रास झाला नाही. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आमच्यासाठी किती कष्ट घेत होत्या !’, हे आमच्या नंतर लक्षात आले. आम्ही श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
३ ई. तिरुपती येथे गेल्यावर गुरुकृपेने साधकांचे रक्षण होणे
३ ई १. तिरुपती येथे एका हितचिंतकांनी साधकांची डोंगरावर रहाण्याची सर्व व्यवस्था करणे : २०.३.२०२१ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने आम्ही तिरुपती येथे दर्शनासाठी गेलो होतो. तेथे आपले एक हितचिंतक आहेत. ते तिरुपती मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी सर्व सोय करत असत. ते आम्हाला तिरुपतीच्या डोंगराच्या खाली भेटले आणि त्यांनी आमच्या समवेत गाडीत बसून ४० मिनिटे प्रवास केला. आमची डोंगरावर रहाण्याची सर्व व्यवस्था होईपर्यंत ते आमच्या समवेत होते. आमची व्यवस्था झाल्यावर ते खाली गेले. ते दुसर्या दिवशी सकाळी आम्हाला भेटणार होते; परंतु दुसर्या दिवशी त्यांच्याकडे तेलुगु चित्रपट उद्योगाशी (‘फिल्म इंडस्ट्री’शी) निगडित एका मोठ्या अभिनेत्याचा परिवार आला. त्या परिवारातील १९ सदस्यांना घेऊन ते तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले. त्यामुळे नंतर आमची आणि त्या हितचिंतकांची भेट झाली नाही.
३ ई २. ‘न भूतो न भविष्यति’ असे ‘तिरुपती बालाजी’ देवाचे दर्शन होणे, पुजार्यांनी देवाचे वस्त्र साधकांच्या डोक्यावर ठेवणे आणि त्याला कापराचा सुगंध येणे : दुसर्या दिवशी आम्हाला ‘न भूतो न भविष्यति’ असे तिरुपती बालाजीचे दर्शन झाले. आम्ही आतापर्यंत अनेक वेळा तिरुपतीला जाऊनही आम्हाला कधीही देवाच्या समोर २ मिनिटांहून अधिक वेळ उभे रहायला दिले नव्हते; पण या वेळी आम्हाला देवाच्या गाभार्याच्या बाहेर १० ते १५ मिनिटे उभे राहून दर्शन घेण्याची संधी मिळाली. देवाचे वस्त्र ज्या खोलीत ठेवतात, त्या खोलीत आम्हाला जायला मिळाले. पुजार्यांनी देवाचे वस्त्र आमच्या डोक्यावर ठेवले आणि आमचे डोके पूर्णपणे त्या वस्त्राने झाकले. त्याला कापराचा सुगंध येत होता. तो सुगंध आमच्या नाका-तोंडात गेला. ‘२२ वेळा तिरुपती बालाजीच्या दर्शनाला येऊनही असे कधीच घडले नाही; पण या वेळी असे कसे घडत आहे ?’, असे वाटले. आमच्यासाठी हा सगळा प्रकार एक चमत्कारच होता.
३ ई ३. तिरुपती येथून निघाल्यावर हितचिंतकांजवळ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना संपर्क करणे, हितचिंतकाना कोरोनाची लागण होणे आणि ४ दिवसांनी त्यांचे निधन झाल्याचे समजणे अन् वस्त्राच्या माध्यमातून प्रत्यक्ष देवाने साधकांसाठी उपाय करून संकट दूर केल्याचे लक्षात येणे : दुसर्या दिवशी आम्ही तिरुपती येथून निघतांना ज्या हितचिंतकांनी आमची सर्व व्यवस्था केली, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांना भ्रमणभाष केला. तेव्हा त्यांच्या मुलाने आम्हाला सांगितले, ‘‘माझ्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले. त्यांची ४ दिवसांत प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.’’ त्यांचे बोलणे ऐकल्यावर आमच्या लक्षात आले, ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यामुळेच आम्हा सर्वांचे रक्षण झाले. आम्हाला कधी नव्हे, तो देवाच्या वस्त्राचा सुगंध मिळाला आणि त्या वस्त्राच्या माध्यमातून प्रत्यक्ष देवाने आमच्यासाठी उपाय केले आणि ‘आमच्यावर आलेले संकट दूर केले.’
४. साधकांचे ज्या ठिकाणी जाण्याचे नियोजन व्हायचे, त्या ठिकाणची परिस्थिती लगेच पालटण्यास आरंभ होणे आणि हे देवाचे नियोजन असल्याचे लक्षात येणे
उत्तर भारतात कोरोनाचे प्रमाण पुष्कळ होते. त्यामुळे आम्हाला ‘त्या ठिकाणी कसे जायचे ?’, असा प्रश्न पडायचा. एकदा आम्हाला महर्षींकडून ‘तिथे जायचेच आहे’, असा निरोप आला. तेव्हा आमच्या लक्षात आले की, ‘आम्ही ज्या ठिकाणी जाणार असू, त्या त्या ठिकाणच्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या न्यून होऊ लागली आहे.’ आमचे जयपूर, जोधपूर (राजस्थान), देहली असे अनेक शहरांत जायचे ठरल्यावर आश्चर्य म्हणजे त्या त्या ठिकाणी आपोआप कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या न्यून होत असे आणि त्या ठिकाणाहून आम्ही बाहेर पडलो, तर पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याचे दिसायचे. आम्हाला एका राज्यातून दुसर्या राज्यात जायचे असायचे, तोपर्यंत त्या राज्यातील दळणवळण बंदीचे नियम शिथिल झालेले असायचे. तेव्हा ‘सर्वकाही देवाच्या इच्छेने होते आणि देवच त्याचे कार्य करवून घेत आहे’, हे आमच्या लक्षात आले. ही आमच्यासाठी पुष्कळ मोठी अनुभूती होती.
५. कोरोना महामारीमध्येही दौरा दीड वर्ष चालू असणे आणि ‘देवाच्या कार्यासाठी गेल्यावर देवच सर्व काळजी घेतो’, याची प्रचीती येणे
कोरोना महामारीमध्ये दौरा चालू होऊन दीड वर्ष झाले. या दीड वर्षात एक मोठी अनुभूती म्हणजे आम्ही सेवेसाठी ७ ते १० राज्यांत गेलो; मात्र एकदाही आम्हाला अडचण आली नाही. आज कुणालाही एका राज्यातून दुसर्या राज्यात जाण्यासाठी किती खटाटोप करावा लागतो. वैयक्तिक कामासाठी कुठे जायचे असल्यास कितीतरी अडचणी येतात; मात्र ‘देवाच्या कार्यासाठी आपण गुरूंसमवेत जायचे ठरवले, तर देव आपली सर्व काळजी घेतो’, याची आम्हाला प्रचीती आली.
आमचा नियमित दौरा चालू असल्याने काही वेळा ‘खरंच कोरोनाचे संकट आहे का ?’, असा आम्हाला प्रश्न पडतो. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत या दौर्यात आम्हाला २ वेळा भारत प्रदक्षिणा करता आली. केवळ सनातनचे तीन गुरु, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या कृपेमुळेच हे शक्य झाले. या एक-दीड वर्षात तसे बघितले, तर आम्हाला कितीतरी वेळा कोरोना होऊ शकला असता; मात्र तीन गुरूंनी आम्हा साधकांचे रक्षण केले, यासाठी आम्ही दौर्यातील सर्व साधक परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– श्री. स्नेहल राऊत, देहली (१७.७.२०२१)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |