गोवा शासनाने कोरोनाविषयक निर्बंधांचा कालावधी १५ फेब्रुवारीपर्यंत वाढवला
शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत बंद रहाणार
पणजी, २३ जानेवारी (वार्ता.) – गोव्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने गोवा शासनाने राज्यात २९ डिसेंबरपासून लागू केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंधाचा कालावधी १५ फेब्रुवारीपर्यंत वाढवला आहे, तसेच गोव्यातील शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.
महसूल खात्याचे सचिव संजय कुमार यांनी २३ जानेवारी या दिवशी शैक्षणिक संस्थांना उद्देशून आदेश काढला आहे. यामध्ये म्हटले आहे की, शाळा, महाविद्यालये आणि उच्च शिक्षण देणार्या इतर संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बंद रहाणार आहेत; मात्र शिक्षक ‘ऑनलाईन’ वर्ग घेण्यासाठी शाळांमध्ये उपस्थित रहाणार आहेत. परीक्षा चालू असलेल्या उच्च शिक्षण देणार्या संस्था आणि महाविद्यालये यांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नेमलेल्या कृती दलाने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून हा निर्णय घेतला आहे.’’
(सौजन्य : Prudent Media Goa)
कॅसिनो, चित्रपटगृहे आदी निम्म्या क्षमतेने कार्यरत रहाणार
या अंतर्गत कॅसिनो, चित्रपटगृहे, रिव्हर क्रूझ (पर्यटन जहाज), वॉटरपार्क (पाण्यातील खेळ) आदी निम्म्या क्षमतेने कार्यरत रहाणार आहेत. रेस्टॉरंट, मसाज पार्लर आदी ठिकाणी प्रत्येकाने मास्क घालणे, सातत्याने सॅनिटायझरचा वापर करणे, प्रवेश करणार्या ग्राहकाचे शरिराचे तापमान तपासणे, कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेले किंवा कोरोना झाला नसल्याचे प्रमाणपत्र असलेले यांनाच प्रवेश देणे आदी कृती करणे बंधनकारक आहे. परराज्यांतून गोव्यात प्रवेश करतांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेले किंवा कोरोना नसल्याचे प्रमाणपत्र (प्रवासाला आरंभ करण्याच्या ७२ घंट्यांच्या आत घेतलेले प्रमाणपत्र) असलेले यांनाच प्रवेश देणे आदी कृती करणे बंधनकारक आहे.
गोव्यात दिवसभरात कोरोनाबाधित ८ रुग्णांचा मृत्यू, तर १ सहस्र ५८२ कोरोनाबाधित नवीन रुग्ण
राज्यात २३ जानेवारी या दिवशी कोरोनाबाधित ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३ सहस्र ६१० झाली आहे. ८ रुग्णांपैकी ३ रुग्णांचा रुग्णालयात भरती केल्यानंतर २४ घंट्यांच्या आत मृत्यू झाला. २३ जानेवारी या दिवशी कोरोनाविषयी ३ सहस्र ९३७ चाचण्या करण्यात आल्या, तर यामध्ये १ सहस्र ५८२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यामुळे चाचणीच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण ४०.१८ टक्के आहे.