सैन्याच्या नोकर भरती परीक्षेत झालेल्या घोटाळ्यातील आणखी एक आरोपी कह्यात !

६० जणांना प्रश्नपत्रिका दिली असल्याची पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची माहिती !

आरोपींना त्वरित आणि कठोर शिक्षा न झाल्याने असे गैरप्रकार वाढत आहेत ! – संपादक 

पिंपरी – सैन्यातील ‘स्टोअर किपर’ आणि ‘मल्टिटास्क ड्रायव्हर व्हेइकल’ या पदासाठी ३१ ऑक्टोबर २०२१ या दिवशी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत ६० परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका दिल्याची माहिती अन्वेषणात उघड झाली आहे. या प्रकरणी देहली येथून राजेशकुमार ठाकुर याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्यामुळे आतापर्यंत या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या ४ झाली आहे अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोपीने प्रश्नपत्रिकांच्या बदल्यात पुणे विमानतळावर रोख रक्कम स्वीकारली, तर काही रक्कम मुलाच्या अधिकोषातील खात्यात जमा केल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे. आरोपीने किती परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका दिल्या ? आणि किती रक्कम घेतली ? याचे अन्वेषण चालू आहे.