गावगुंडांना गृहराज्यमंत्री यांचे अभय आहे का ? – सदाभाऊ खोत, माजी मंत्री

गर्भवती महिला वनरक्षक यांना माजी सरपंचाने मारहाण केल्याचे प्रकरण !

माजी मंत्री सदाभाऊ खोत

सातारा, २३ जानेवारी (वार्ता.) – माजी सरपंचांसारखे गावगुंड जर बिनधास्त फिरत असतील, तर या गावगुंडांना गृहराज्यमंत्री यांचे अभय आहे का ? असा प्रश्न माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला.

सातारा जिल्ह्यातील पळसावडे गावात गत आठवड्यात वनरक्षक दाम्पत्याला मारहाण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना खोत यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली.

खोत म्हणाले की, माजी सरपंच रामचंद्र जानकर यांच्यावर कडक कारवाई करून द्रुतगती न्यायालयात खटला चालवण्यात यावा, तसेच माजी सरपंचाने अशा किती कार्यालयांना वेठीस धरले आहे ?, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. एका प्रतिष्ठित उत्तरदायी पदावरून सेवामुक्त झाल्यानंतर असे कृत्य करणे म्हणजे राज्यात मोगलाई लागून गेली आहे का ?