श्रीरामावतार होण्यासाठी ‘पुत्रकामेष्टी’ याग करणारे शृंगीऋषि यांच्या बागी (हिमाचल प्रदेश) येथील तपोभूमीचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी घेतलेले दर्शन !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या देवभूमी हिमाचल प्रदेशच्या दैवी दौर्याचा वृत्तांत
‘१९.६.२०२१ या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सप्तर्षी जीवनाडीपट्टीत सांगितल्याप्रमाणे देवभूमी हिमाचल प्रदेशचा प्रवास आरंभ केला. या दौर्यात त्यांनी हिमाचल प्रदेश राज्यातील कुलु जिल्ह्यातील विविध दैवी स्थानांना भेट देऊन ‘आपत्काळात साधकांचे रक्षण व्हावे आणि ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना व्हावी’, यासाठी प्रार्थना केली. अशा या दैवी क्षेत्रांतील कुलु प्रदेशात अनेक ऋषींची तपस्थाने आहेत. तेथे असलेल्या ‘शृंगीऋषि’ यांच्या तपस्थानाविषयी जाणून घेऊया.
१. शृंगीऋषि मंदिर
हिमाचल प्रदेशमधील कुलु जिल्ह्यातील बागी नावाच्या गावात ‘शृंगीऋषींचे मंदिर’ आहे. कुलु शहरापासून २ घंटे अंतरावर बंजार खोर्यात हे गाव उंच पर्वतावर आहे. गावाच्या पाठीमागे हिमालयाची काही शिखरे दिसतात. या शिखरांवर शृंगीऋषींचे वास्तव्य होते. ही शिखरे अत्यंत दुर्गम आहेत. ‘भाविकांना शृंगीऋषींची नित्य पूजा करता यावी’, यासाठी बागी गावात शृंगीऋषींचे मंदिर बांधले आहे.
२. शृंगीऋषींचा परिचय
शृंगीऋषि हे विभांडकऋषींचे पुत्र आणि कश्यपऋषींचे नातू होते. शृंगीऋषींनी आत्मज्ञानाने जाणले होते की, ‘दशरथाने ‘पुत्रकामेष्टी’ याग केला, तर त्यांची पत्नी कौसल्येच्या पोटी श्रीविष्णु श्रीरामरूपात जन्माला येणार आहे.’ शृंगीऋषींनी केलेल्या ‘पुत्रकामेष्टी यागा’मुळे श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला.
‘शृंगीऋषि’ नसते, तर आपण श्रीरामजन्माची कल्पना करू शकत नाही. अशा थोर ऋषींच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्प आहे.
संग्राहक : श्री. विनायक शानभाग, कुलु, हिमाचल प्रदेश. (२६.६.२०२१)
क्षणचित्रे
१. शृंगीऋषींच्या मंदिरातील पुजार्यांनी ‘सनातन संस्थे’च्या कार्यासाठी आशीर्वाद स्वरूपात शृंगीऋषींच्या पालखीवरील वस्त्र देणे
‘शृंगीऋषींच्या मंदिरात गेल्यावर तेथील पुजारी श्री. जीतेंद्र यांनी आम्हाला शृंगीऋषींविषयी सर्व माहिती सांगितली. त्यांनी आम्हाला ‘सनातन संस्थे’च्या कार्याला शृंगीऋषींकडून आशीर्वाद म्हणून त्यांच्या पालखीवरील वस्त्र दिले.
२. कुलु येथील शृंगीऋषींचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान
स्थानिक लोक शृंगीऋषींना ‘शृंगा ऋषि’, असे म्हणतात. हिमाचली भाषेत त्यांना ‘स्किर्णी देव’, असे म्हणतात. भारतात शृंगीऋषींची मोजक्याच स्थानांपैकी कुलु येथील स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे.
३. शृंगीऋषींचे मुख्य तपस्थळ ‘रक्तीसर’ शिखरावर असून तेथे १२ मास हिम असला, तरी सहस्रो भक्त ‘रक्तीसर यात्रा’ करत असणे
समुद्रपातळीपासून ७ सहस्र फूट उंचीवर शृंगीऋषींचे मंदिर असलेले बागी गाव आहे. येथून शृंगीऋषींचे मुख्य तपस्थळ १४ सहस्र फूट उंचीवर असलेल्या हिमालय पर्वतावरील ‘रक्तीसर’ शिखरावर आहे. वर्षातून एकदा सहस्रो भक्त ‘रक्तीसर यात्रा’ करतात. भक्त शृंगीऋषींची पालखी घेऊन रक्तीसरला जातात. रक्तीसरवर १२ मास हिम असते. त्यामुळे यात्रा करणे कठीण असते. आजपर्यंत ही परंपरा चालवणार्या भक्तांच्या चरणी साधक कोटीशः कृतज्ञ आहेत.’
– श्री. विनायक शानबाग, कुलु, हिमाचल प्रदेश. (२६.६.२०२१)
वाल्मीकि रामायणातील ‘बालकांडा’त ‘शृंगीऋषि’आणि ‘पुत्रकामेष्टी याग’ यांचा उल्लेख असणे
‘वाल्मीकि रामायणात ‘बालकांडा’मध्ये ‘शृंगीऋषि’ आणि ‘पुत्रकामेष्टी याग’ यांचा उल्लेख आहे. हा याग सर्वांत कठीण आहे. याग अंतिम टप्प्यात असतांना देवता वैकुंठात श्रीविष्णूकडे जाऊन सांगतात, ‘भगवंता, आता तुम्ही रावणासुराच्या वधासाठी अवतार धारण करण्याची वेळ आली आहे.’ तेव्हा श्रीविष्णु दशरथाच्या घरी अवतार धारण करायला सिद्ध होतो. पृथ्वीवर अयोध्येत ‘पुत्रकामेष्टी’ याग पूर्ण होतो आणि यज्ञपुरुषाचे अग्नीत आगमन होते. दशरथ राजाला सोन्याच्या पात्रात ‘पायस’ (तांदुळाची खीर) प्राप्त होते आणि त्या क्षणी देवता शृंगीऋषींवर पुष्पवृष्टी करतात. श्रीविष्णु पृथ्वीवर येतो. या सर्व दैवी घटनांचे अतिशय सुंदर वर्णन करणारे आदि कवी वाल्मीकिऋषींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
संग्राहक : श्री. विनायक शानभाग, कुलु, हिमाचल प्रदेश. (२६.६.२०२१)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |