गोव्यात कोरोनाचा प्रकार ‘ओमिक्रॉन’ कि ‘डेल्टा’ प्रभावी आहे, याविषयी अजूनही अनिश्चितता
पणजी, २२ जानेवारी (वार्ता.) – गोव्यात कोरोनाच्या चाचणीच्या तुलनेत रुग्ण आढळण्याची टक्केवारी ४० टक्क्यांच्या आसपास असूनही, तसेच दिवसागणिक सुमारे ३ सहस्र कोरोनाबाधित नवीन रुग्ण आढळूनही गोव्यात तिसर्या लाटेत कोरोनाचा प्रकार ओमिक्रॉन’ किंवा ‘डेल्टा’ प्रभावी कि अन्य कोणता प्रकार प्रभावी आहे ? याविषयी अजूनही अनिश्चितता आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या लाळेचे अनेक नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत: मात्र यांमधील १५ डिसेंबरनंतर पाठवण्यात आलेल्या सुमारे २०० नमुन्यांचा अहवाल अजूनही आलेला नाही. गेल्या २० दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची झपाट्याने वाढत चाललेली रुग्णसंख्या पहाता गोव्यात कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’ प्रभावी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Omicron? Delta? Goa clueless about what’s driving third wave https://t.co/kMKAgdJ5EW
— TOI Cities (@TOICitiesNews) January 22, 2022
आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. इरा आल्मेदा म्हणाल्या, ‘‘गोव्यात इतर राज्यांप्रमाणे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने येथे कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’ प्रभावी असण्याची शक्यता अधिक आहे.’’
हृदयरोगतज्ञ डॉ. अनिल मेहनडीरट्टा यांनीही या शक्यतेला दुजोरा दिला. ते पुढे म्हणाले, ‘‘कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याने ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग टाळता येणार नाही; मात्र लस घेतल्याने गंभीर स्वरूपाचे आजार उद्भवत नाहीत किंवा रुग्णाला रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही.’’ ज्येष्ठ सल्लागार पॅथॉलॉजिस्ट डॉ. युजीनी डिसोझा म्हणाले, ‘‘गोवा शासनाकडे कोरोनाचा कोणता प्रकार प्रभावी आहे, हे शोधून त्याप्रमाणे धोरण आखण्यासाठी अपेक्षित आकडेवारी उपलब्ध नाही. कर्नाटक राज्यात कोरोनाचा ‘डेल्टा’ किंवा त्याचे उपप्रकार प्रभावी असल्याचे आढळल्याने आणि गोव्यात कोणतीही चाचणी न करता प्रवासी परराज्यांतून येत असल्याने गोव्याला मोठा धोका संभवत आहे. गोव्याच्या सीमांवर केवळ कोरोनाची लस न घेतलेल्या प्रवाशांचीच चाचणी केली जात आहे.’’