संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचे पुण्यात निधन !
पुणे – संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचे २२ जानेवारीच्या पहाटे पुण्यात निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी आणले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. वर्ष २०१८ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.
महाराष्ट्र शासन पुरस्कृत ‘बालगंधर्व’ पुरस्कार, नाट्यदर्पण रजनीचा ‘नाट्यव्रती’ सन्मान, पुणे महापालिकेचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार हे त्यांना मिळालेले काही मानसन्मान होत. ‘संगीत कान्होपात्रा’सह जुन्या नाटकातील गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोचवला, तसेच कीर्ती आणि पैसे यांचा मोह बाजूला ठेवत, मराठी संगीत रंगभूमीची सेवा ५० हून अधिक वर्षे अविरतपणे केली.