पोलीस विभागातील सामान्य कर्मचार्याने व्यक्त केलेली व्यथा !
पोलीसदलात निष्ठेने कर्तव्य पार पाडणार्या कर्मचार्यांना कामाचे श्रेय देण्याऐवजी कामचुकारपणा करणार्यांना ते दिले जाणे, हे व्यवस्थेला लज्जास्पद !
१. पोलीस विभागामध्ये निष्ठेने काम करणार्या पोलीस कर्मचार्यांना अधिक कामामुळे ताण सहन करावा लागणे
‘पोलीस विभागामध्ये काम केले नाही, तरी चालेल; परंतु अधिकार्यांपुढे हुजरेगिरी करणे आवश्यक असते. या विभागामध्ये लाच घेणारे, व्यसनाधीन, पत्ते खेळणारे, जुगार खेळणारे, कर्जबाजारी, मुलांचे शिक्षण अर्धवट असणारे, मुलाला नोकरी नसणारे अशा कर्मचार्यांचा एक गट असतो. पोलीस अधिकार्यांच्या निवासस्थानीच पोलीस विभागातील बराचसा कर्मचारी वर्ग काम करण्यासाठी वापरला जातो. हा वर्ग या अधिकार्यांच्या नावावर त्यांना नेमून दिलेले काम करण्यास टाळाटाळ करत असतो. त्यामुळे निष्ठेने काम करणार्या पोलीस कर्मचार्यांना अधिक प्रमाणात काम करावे लागते. त्याचा त्यांना ताणही सहन करावा लागतो.
२. पोलीस विभागातील लेखनिकाकडून होणारा भ्रष्टाचार
पोलीस विभागामध्ये लेखनिक हे पद असतांनाही शेकडा ७५ टक्के काम त्याच्या हाताखाली दिलेले पोलीस कर्मचारीच करत असतात आणि अधिकारी वर्गही त्यांच्याच बाजूने असतो. त्यातील काही पदे पुढीलप्रमाणे आहेत.
२ अ. आस्थापना : या विभागाकडे पोलीस कर्मचार्यांचे स्थानांतर करणे, रजा देणे, पोलीस कर्मचार्यांचे स्थानांतर झाल्यावर आणि तो सेवानिवृत्त झाल्यावर त्यांची संपूर्ण माहिती विभागाला देणे हे दायित्व असते. या शाखेत पैसे दिल्याविना वरील कामे होतच नाहीत.
२ आ. लेखा विभाग : या विभागाकडे सरकारला स्वतःची रजा विकणे, कर्मचार्याचे स्थानांतर झाल्यावर किंवा तो सेवानिवृत्त झाल्यावर त्याच्या नावावर देय असणारी रक्कम देणे, कर्मचार्याने रुग्णालयाची दिलेली देयके संमत करणे, भविष्यनिर्वाह निधीतून मुलांच्या विवाहासाठी रक्कम संमत करणे, नवीन किंवा जुनी वास्तू घेण्यासाठी देयक सिद्ध करणे हे दायित्व असते. येथेही पैसे दिल्याविना वरील कामे होत नाहीत. पैसे दिले नाहीत, तर संबंधित कर्मचार्याच्या कामात अडथळा निर्माण करून त्याची पिळवणूक केली जाते. पोलीस वसाहतीमध्ये निवास मिळवतांना सदर लेखनिक आणि त्यांचा कर्मचारी वर्ग त्यांना मिळालेला भ्रष्टाचारी पैशांचा काही भाग अधिकार्यांना देतात. तसेच काही लेखनिक अधिकार्यांसाठी कामे करतात. त्यामुळे त्यांची तक्रार केली, तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.
३. सनातन संस्थेत निष्काम भावाने सेवा करत असूनही त्यावर सहकार्यांचा विश्वास न बसणे
मी पोलीस विभागामध्ये नोकरी करत असतांना सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत होतो. त्यामुळे मी ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, ग्रंथ प्रदर्शनाच्या ठिकाणी साहाय्य करणे आदी सेवा करायचो. ‘यातून मला पैसे मिळत असतील’, असे माझ्या सर्व सहकार्यांना वाटायचे. त्यांना वाटायचे की, आजच्या काळात कोण आपला वेळ आणि पेट्रोलसाठी पैसे वाया घालवणार आहे ! मी घरात काही वस्तू घेतली, तर ‘त्यासाठी मला सनातन संस्थेने साहाय्य केले असणार’, असा त्यांचा अपसमज व्हायचा. याविषयी मी त्यांना अनेक वेळा सांगितले, ‘सनातन संस्था कुणाला अशा प्रकारे पैसे देत नाही. ज्यांना हिंदु धर्माविषयी प्रेम आहे आणि ज्यांना हिंदु धर्मासाठी निःस्वार्थपणे तन, मन अन् धन यांचा त्याग, तसेच सेवा करायची आहे, त्यांनाच सनातन संस्थेमध्ये स्थान आहे.’
४. ज्येष्ठ अधिकार्यांच्या दृष्टीने चांगले काम करणार्या बहुतांश कर्मचार्यांची शून्य किंमत असणे आणि कर्मचार्यांनी चांगले कृत्य करूनही त्याचे श्रेय हुजरेगिरी करणार्यांनाच दिले जाणे
मी व्यसनाधीन, जुगार खेळणारा, कर्जबाजारी, शासकीय काम केल्यावर लाच घेणारा, अधिकार्यांपुढे हुजरेगिरी करणारा आणि त्यांना पैसे देणारा अशांपैकी नव्हतो. त्यामुळे मला माझ्या कामाच्या व्यतिरिक्त अन्य कामे करावी लागत असत. कधीकधी मला ताण यायचा. माझ्या या स्वभावामुळे मला पोलीस विभागात मित्रही अल्प होते.
कर्मचार्याने कितीही व्यवस्थित काम केले, तरी अधिकार्यांपुढे त्याची किंमत शून्य असते; कारण त्यांना चुकीच्या कामात साहाय्य करणारी व्यक्ती हवी असते. तुम्ही प्रलंबित काम योग्य प्रकारे केल्यावर तुमच्याकडे दुसरे प्रलंबित काम सोपवले जाते. तसेच त्याचे श्रेय आणि मोबदला न देता असे दोष असलेल्या कर्मचार्यांना त्याचे श्रेय दिले जाते. एवढेच नाही, तर ज्येष्ठ अधिकार्यांपुढे ‘तुम्ही चुकीचे आणि कामचुकार आहात’, असे सांगितले जाते.’
– एक पोलीस कर्मचारी
पोलीस वसाहतीतील दुरवस्था आणि असंवेदनशीलतापोलीस वसाहतीमधील खोल्या पुष्कळ जुन्या झाल्या आहेत. त्यांच्या डागडुजीसाठी प्रत्येक मासात पोलीस कर्मचार्याच्या वेतनातून ठराविक रक्कम कपात करण्यात येते. या खोल्यांच्या दुरुस्तीचे दायित्व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते. पोलीस वसाहतीमधील खोल्यांच्या दुरुस्तीची निविदा प्रत्येक वर्षी न काढता २ वर्षांतून किंवा काही वेळेला ७-८ वर्षांतून एकदा काढली जाते. त्या माध्यमातून वसाहतीमधील खोल्यांना रंग देणे, तसेच दारे, फरशी इत्यादींची दुरुस्ती केली जाते. ज्या कर्मचार्याला खोली मिळाली, त्यानेच नळ आणि पंखे यांची दुरुस्ती करावयाची असते. बहुतांश कामे ही मार्च मासात निविदा काढून करण्यात येतात. कंत्राटदाराकडून ही कामे व्यवस्थित केली जात नाहीत. तसेच ते काही कामे अपूर्णावस्थेत ठेवून निघून जातात. अनेक निवासांवर लावलेली कौले १० ते २० वर्षांपूर्वीची, म्हणजे निवास बांधले, तेव्हाची आहेत. ती फुटलेल्या अवस्थेत आहेत. पावसाळ्यामध्ये त्यातून पाणी गळते. पिण्याचे पाणी आणि ड्रेनेज यांची पाईप लाईन कायमच नादुरुस्त असते. |
सुराज्य स्थापनेचे एक अंग : आदर्श पोलीस
पोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते, त्यांचे चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे खलनायकीकरण यांमुळे आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे. समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत. – संपादक
साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !
पोलीस आणि पोलीसदलाचा प्रशासकीय कारभार यांच्या संदर्भात येणारे चांगले अन् कटू अनुभव, तसेच भ्रष्टाचार रोखण्यासाठी उपाययोजना कळवा !
पोलिसांच्या संदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखमालेत पोलीस करत असलेला भ्रष्टाचार, कामचुकारपणा यांसह पोलिसांनी अन्य अयोग्य गोष्टी रोखायला हव्यात. ‘या संदर्भात काय करता येईल ?’ याविषयी कुणाला ठाऊक असल्यास त्याविषयीची माहिती पुढील पत्त्यावर कळवा. तसेच पोलीस आणि पोलीस दलाच्या अंतर्गत येणारा वाहतूक विभाग यांच्याविषयी आलेले चांगले अन् कटू अनुभव कळवावेत.
अधिवक्ता नीलेश सांगोलकर,
संपर्क क्रमांक : ९५९५९८४८४४
इ-मेल पत्ता : socialchange.n@gmail.com
पत्ता : ‘सुराज्य अभियान’, मधु स्मृती, बैठक सभागृह, घर क्रमांक ४५७, सत्यनारायण मंदिराजवळ, ढवळी, फोंडा, गोवा ४०३४०१.
सरकार किंवा पोलीस यांनी याचा गांभीर्याने विचार करावा !पोलिसांच्या संदर्भातील ही लेखमाला गेले १ वर्ष दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रत्येक रविवारी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यांत पोलिसांच्या संदर्भातील चांगल्या अनुभवांसह त्यांच्याकडून येणारे कटू अनुभव, त्यांच्याकडून केला जाणारा भ्रष्टाचार, सर्वसामान्यांवर होणारा अन्याय, लाचखोर वृत्ती, निर्दयीपणा यांसंदर्भात विविध प्रकारचे लिखाण प्रसिद्ध करण्यात आले. खरेतर ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे पोलीस विभागाचे ब्रीदवाक्य आहे; पण आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनेक लेखांमधून पोलीस विभागाची अन्यायकारक वृत्तीच दिसून येते. एखाद्या वृत्तपत्रातून हे वास्तव उघड केले जात असूनही सरकार किंवा पोलीस यांना लाज कशी वाटत नाही ? या सगळ्याच्या विरोधात काही करावेसे का वाटत नाही ? याचा सरकार किंवा पोलीस यांनी गांभीर्याने विचार करावा ! |