भारताच्या विरोधात प्रचार करणार्या पाकच्या ३५ यू ट्यूब वाहिन्यांवर बंदी !
पाकचा आणि तेथील नागरिकांचा भारतद्वेष पहाता ते नवीन यू ट्यूब वाहिन्या चालू करून त्यांद्वारे भारतविरोधी प्रचार करतील ! त्यामुळे भारताविरुद्ध कुणाचेही गरळओक करण्याचे धाडस होणार नाही, असा वचक सरकारने जगभरात निर्माण केला पाहिजे ! त्यासाठी असे कृत्य करणार्यांविरुद्ध धडक कारवाई केली पाहिजे !
नवी देहली – भारताच्या विरोधात प्रसार केल्यामुळे भारत सरकारने पाकमधून चालवण्यात येणार्या ३५ यू ट्यूब वाहिन्या, तसेच २ ‘इन्स्टाग्राम’ खाती, २ ट्विटर खाती, २ फेसबूक खाती आणि २ संकेतस्थळे यांवर बंदी घातली आहे. या वाहिन्यांच्या वर्गणीदारांची संख्या अनुमाने १ कोटी २० लाख इतकी, तर त्यांवरील व्हिडिओ पाहिलेल्यांची संख्या १३० कोटींहून अधिक आहे.
(सौजन्य : ABP MAJHA)
माहिती आणि प्रसारण खात्याचे सहसचिव विक्रम सहाय म्हणाले की, ही सर्व खाती, वाहिन्या, पाकिस्तानातून चालवली जात होत्या. त्यांवरून भारतीय सैन्यदले, जम्मू-काश्मीर, भारताचा परराष्ट्र व्यवहार, जनरल बिपिन रावत यांचा मृत्यू यांच्याविषयी खोडसाळ प्रचार केला जात होता. यासह फुटीरवादी विचारसरणीला खतपाणी घालून कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणण्याचे काम केले जात होते.