‘भगवंत नृत्य करवून घेतो’, याची अनुभूती घेणारे प्रसिद्ध कथ्थक नर्तक पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज !
प्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज (ब्रिजमोहन मिश्रा) हे कथ्थक नृत्याच्या लखनौ (लक्ष्मणपुरी) घराण्यातील कालका-बिंदादीन घराण्याचे अग्रगण्य नर्तक होते. वयाच्या १३ व्या वर्षापासून त्यांनी देहलीतील ‘संगीत भारती’ या संस्थेत नृत्य अध्यापनास आरंभ केला. भारतीय शास्त्रीय नृत्य, विशेषकरून कथ्थक नृत्याला भारतात, तसेच विदेशात सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यामध्ये पंडित बिरजू महाराज यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या अखेरच्या काळातही त्यांचे हे कार्य अविरत चालू होते. त्यांच्या तालबद्ध आणि लालित्याने ओतप्रोत भरलेल्या कथ्थक नृत्याने सर्वच रसिकप्रेक्षकांना अनेक दशके भूरळ घातली आहे. श्रीकृष्ण हे त्यांचे आराध्यदैवत होते. नृत्य करतांना त्यांचे श्रीकृष्णाशी सतत अनुसंधान असायचे. आयुष्यभर कलेची साधना करणारे कथ्थक नृत्यकलेचे तपस्वी पद्मविभूषण पं. बिरजू महाराज नृत्य करता करता अध्यात्म कसे जगले, हे त्यांच्या जीवनप्रवासातील काही निवडक प्रसंगांतून येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.
संकलक – सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर, नृत्य अभ्यासिका, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
१. शास्त्रीय नृत्य आणि साधना या विषयावरील पंडित बिरजू महाराज यांचे विचार !
अ. भारतीय शास्त्रीय नृत्य हे साधनेचे एक अंग असल्याने त्याला ‘नृत्यसाधना’ म्हटले जाणे ! : ‘भारतीय शास्त्रीय नृत्य हे ईश्वराच्या अनुसंधानात रहाण्याच्या (साधनेच्या) मार्गांपैकी एक आहे’, असे मला वाटते; म्हणूनच त्याला ‘नृत्यसाधना’ असे म्हटले आहे.
नर्तकाला नृत्यकलेसह संगीताचे (गायन आणि वादन यांचे) पुरेसे ज्ञान असल्यास त्याच्या कलेला आधिक वाव मिळतो. नर्तकासाठी ध्यान-धारणा आणि प्राणायाम-आसने करणे, हेसुद्धा अत्यंत महत्त्वाचे ठरते. कथ्थक नृत्य करण्यासाठी श्वासोच्छ्वासावर नियंत्रण, पुरेशी शक्ती आणि क्षमता असणे पुष्कळ आवश्यक आहे.’
आ. नृत्याद्वारे स्वतः साधना केली की, त्या माध्यमातून इतरांनाही आनंद देता येतो ! : माझे आजोबा, माझे वडील आदींनी कथ्थकमध्ये ज्या रचना केल्या, त्या आपण आजही नाचतो. त्या रचना अधिक चांगल्या प्रकारे सादर होण्यासाठी प्रयत्न करतो. त्या कधीच जुन्या होत नाहीत; कारण नृत्यरचना करणे, ही मोठी तपस्या आहे. या केवळ २ मात्रांच्या (पाश्चात्त्यांसारख्या) रचना नाहीत, यात संतुलन असते. ध्यान करावे लागते, तेव्हा त्यातून साधना होते. साधना झाल्यामुळे त्यातून आनंद मिळतो, प्रसन्नता वाटते आणि त्यातून आपण इतरांनाही आनंद देऊ शकतो.’
(संदर्भ : पद्मविभूषण पं. बिरजू महाराज यांच्यासंदर्भातील वृत्तपत्रीय कात्रणांतून संकलित लिखाण)
२. स्वतःच्या माध्यमातून भगवंत नृत्य करत असल्याची पंडित बिरजू महाराज यांना अनुभूती !
अ. ‘मी रंगमंचावर उभा राहिलो की, देव येणारच आणि नाचणारच’, अशी श्रद्धा ! : जेथे आत्मा आहे, तेथे अध्यात्मही असतेच. ईश्वर सतत माझ्यासमवेतच असतो. माझी देवपूजा प्रतिदिन रात्री १२ वाजता संपते. कित्येक पिढ्यांपासूनची श्रीकृष्णमूर्ती माझ्यासमवेत सतत प्रवास करते. असा हा श्रीकृष्ण माझ्यात येऊन नाचणार नाही काय ? शेवटी आपण मंदिर कशाला म्हणतो ? मंदिर हे देवाला भेटण्याचे माध्यम असते. आपले शरीर हेसुद्धा असेच मंदिर आहे. मी रंगमंचावर उभा राहिलो की, देव येणारच आणि नाचणारच. त्याला तसे बघण्यात आनंद आहे.’ (संदर्भ : पद्मविभूषण पं. बिरजू महाराज यांच्यासंदर्भातील वृत्तपत्रीय कात्रणांतून संकलित लिखाण)
आ. पंडित बिरजू महाराज यांचा नृत्याप्रतीचा भाव ! : नृत्याच्या रंगमंचावर आल्यावर ते नेहमी म्हणायचे, ‘‘नृत्य हेच अध्यात्म आहे. मी नववधूप्रमाणे नृत्यासाठी सर्व सिद्धता करतो. तो भगवंत माझ्याकडून सर्व करवून घेतो. मी काहीच करत नाही.’’ – सौ. ज्योती शिधये, संचलिका, विशाखा नृत्यालय, डोंबिवली, ठाणे.
शिष्याला घुंगरू (दीक्षा) देण्यासाठी त्यांच्या पायांना स्पर्श करतांना गुरुपरंपरेला स्मरून प्रार्थना करणारे पंडित बिरजू महाराज ! : ‘शिष्याने नेहमीच गुरूंच्या पाया पडायचे असते; मात्र शिष्याला घुंगरू (दीक्षा) देतांना गुरु शिष्याच्या एकदाच पाया पडतात. मी माझ्याकडे नृत्य शिकण्यासाठी येणार्या प्रत्येकाला घुंगरू देतांना माझे गुरु, नृत्यातील गुरुपरंपरा यांना आठवून त्यांना आणि ईश्वराला प्रार्थना करतो, ‘यांना त्यांच्या पायांतील या घुंगरांच्या नादातून भविष्यात सर्वांना उज्ज्वलता, शांती आणि आनंद देता येऊ दे.’ – पद्मविभूषण पं. बिरजू महाराज, देहली |
३. प्रसिद्धी वलयांकित कलाकार असूनही आपुलकीने संवाद साधणारे पंडित बिरजू महाराज यांच्या भेटीदरम्यान अनुभवलेले त्यांचे प्रेम !
‘पं. बिरजू महाराज यांचे राहणीमान पुष्कळ साधे होते. त्यांच्या वागण्या-बोलण्यामध्ये ‘मी कोणीतरी मोठा आहे, कलेचा मोठा उपासक आहे’, असे कधीच जाणवायचे नाही. आम्ही मुंबईला असतांना जुहू (मुंबई) येथील इस्कॉनच्या ‘हरे राम हरे कृष्ण’ मंदिरामध्ये पंडित बिरजू महाराज यांच्या नृत्याचा कार्यक्रम होता. त्यांनी आम्हाला (मी, माझे यजमान (श्री. रामचंद्र शेळके, एम्.ए. नाट्यशास्त्र यांनी पं. बिरजू महाराज यांच्यसह नाट्यक्षेत्रात काम केलेले आहे.) आणि माझी २ वर्षांची मुलगी राधा यांना) कार्यक्रम पहायला आणि तिथे भेटायला बोलावले होते. आम्ही नृत्याच्या कार्यक्रमानंतर ‘ग्रीनरूम’मध्ये (प्रेक्षागृहातील कलाकारांसाठीचा विश्रांतीकक्ष) त्यांना भेटायला गेलो, तेव्हा त्यांनी ‘ते मोठे कोणीतरी आहेत’, असे अजिबात जाणवू दिले नाही. त्यांना पहिल्यांदा भेटून मला पुष्कळ भरून येत होते. त्यांनी कु. राधाच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला सांगितले ‘तू पुष्कळ चांगली नृत्यांगना होशील.’ ते माझ्याशी आणि माझ्या यजमानांशी पुष्कळ आपुलकीने आणि मोकळेपणाने बोलले. कु. राधालाही स्वतःच्या नातीप्रमाणे खेळवले. त्यांनी तिला तोंडभरून आशीर्वाद दिले.
– सौ. शुभांगी रामचंद्र शेळके, (एम्.ए. नाट्यशास्त्र), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
४. कथ्थक नृत्यातील प्रकार सादर करण्यासंदर्भात पं. बिरजू महाराज यांनी आध्यात्मिक स्तरावर केलेले मार्गदर्शन
अ. वंदना – भगवंतापासून संगीताची निर्मिती झालेली असल्याने कलेच्या सादरीकरणाच्या प्रारंभी भगवंताचे स्तवन करणे आणि ते लोकांपुढे सादर करण्यासाठी ते शब्दांच्या माध्यमाची आवश्यकता असणे : ‘जर श्रीकृष्णाने स्वतः नृत्य केले नसते, तर गोपींनी श्रीकृष्णात लीन होऊन नृत्य केले नसते. भगवान शिवाने तांडव नृत्य केले नसते, तर माता पार्वतीपासून लास्य नृत्याची उत्पत्ती झाली असती का ? भगवंताने घुंगरांचा नाद, तसेच स्वर यांच्याद्वारे सकल जनांना आनंद आणि शांती दिली. संगीतात कोणतीही कृती करण्यापूर्वी आपल्या ईष्ट देवतेचे ध्यान (स्मरण) करणे आवश्यक असते. त्यामुळे कोणतीही कृती करण्यापूर्वी भगवंताची स्तुतीपर पदे, वंदना इत्यादींच्या माध्यमातून भगवंताची स्तुती केली जाते.
देवाची पूजा शब्दांविना करू शकतो. लोकांसमोर कला सादर करतांना त्यांना ती समजण्यासाठी शब्दांची आवश्यकता असते. अन्यथा ध्यानाला (भगवंताचे स्मरण करण्याला) शब्दांची आवश्यकता नाही. ध्यानात एकाग्रता असते आणि त्यातच भगवंताची पूजा असते.
आ. तत्कार (पदन्यास) : तत्कार करतांना केवळ पायच नव्हे, तर मुख, डोके, आपला संपूर्ण देह (पायापासून डोक्यापर्यंत सर्व अवयव) आणि मनसुद्धा प्रत्येक लयीच्या चलनाशी एकरूप होते, त्या लयीशी जोडले जाते. (मन, बुद्धी आणि शरीर लयीशी एकरूप होतात.)
कथ्थक नृत्यात ‘ता थैई थैई तत्, आ थैई थैई तत्’ हे तत्काराचे बोल आहेत. हे बोल म्हणजे कथ्थकचा महामंत्र आहे. तो जपत जपत (त्याचा सराव करत करत द्रूत(जलद) गतीत जातो, तेव्हा) त्यातून असा ध्वनी निर्माण होतो, की जणूकाही यज्ञातील अग्नीज्वाळा वर वर जात आहेत.
इ. हस्तक (हातांच्या हालचाली) आणि दृष्टी : हस्तकांच्या सुंदर रूपांशी एकरूप होणे आवश्यक असते. हस्तक हे नृत्यातील अविभाज्य आणि सुंदर घटक आहेत. त्यांचा नियमित सराव करणे आवश्यक आहे. हस्तकांचा सराव करतांना त्यासमवेत ‘यदो हस्त ततो दृष्टि । यदो दृष्टि ततो मनः । यदो मनः ततो भाव । यदो भाव ततो रस ।’ या नाट्यशास्त्रातील श्लोकाप्रमाणे दृष्टीभेदाचाही (नृत्यातील डोळ्यांची हालचाल) सराव आवश्यक असतो.
ई. थाट (कथ्थक नृत्याच्या आरंभी केले जाणारे लयबद्ध आणि सौंदर्यपूर्ण अंगसंचालन) : हे कथ्थकमधील एक महत्त्वपूर्ण अंग आहे. गायन तथा वादन करतांना स्वरांचा विस्तार हळूहळू होत असतो, त्याचप्रमाणे लय आणि नगमा यांवर (सुरांची धुन / गीत) जो राग वाजत असतो, त्याचा सुगंध हळूहळू आपल्या शरीराच्या सर्व भागांत पसरतो. मनगटे, मान आणि भुवया यांमध्ये लयीची गती जाणवू लागते. कंबरेचे संचालन विविध प्रकारे सादर होते. नृत्यातील सुंदरता थाट आणि गतनिकास (विशिष्ट प्रकारची मुद्रा घेऊन चाल चालणे) या दोन प्रकारांत अधिक दर्शवता येते.
उ. उपज (एका बोलातून दुसर्या, तिसर्या बोलाची उत्स्फूर्त निर्मिती करून ती सादर करणे) : कथ्थक नृत्यातला ‘उपज’ हा प्रकार कठीण आहे. उपज हे कधी बनवले जात नाही. ज्याला लय दिसते, समजते आणि ज्याच्यावर देवाची कृपा असते, तोच उपज करू शकतो. अन्यथा कोणालाही उपज करायला जमणे कठीण आहे. जेव्हा मी माझ्या कार्यक्रमांत उपज सादर करतो, ते मला ईश्वर आणि गुरु यांच्या कृपेने सादर करता येते. माझे वडील पंडित अच्छन महाराज यांना लयीचे पुष्कळ ज्ञान होते. त्यांनी याचे पुष्कळ प्रकार केले आहेत. प्रेक्षक त्यांना उपज सादर करण्याची विनंती (फर्माइशी) करायचे. त्यांना तेही त्वरित जमायचे. यालाच म्हणतात, ‘‘ईश्वराची दृष्टी आणि गुरूंची कृपा !’ त्याविना काहीच शक्य नाही. यासाठी लयीची पूजा करा. लयीचे ध्यान करा. त्यातच मग्न राहून सराव करणे आवश्यक आहे, तेव्हा देवाची कृपा होते.’’
– पद्मविभूषण पं. बिरजू महाराज, देहली
५. पंडित बिरजू महाराजांचे कथ्थक नृत्यातील श्रेष्ठत्व दर्शवणारा प्रसंग
अ. पायांत बांधलेल्या १५० – २०० घुंगरांपैकी विशिष्ट घुंगरु वाजवून दाखवणे, तसेच केवळ पाय आणि पायाची बोटे हलवून घुंगरांमधून सप्तसूर काढून दाखवणे : ‘चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षित या पंडित बिरजू महाराजांच्या पट्टशिष्या ! देवदास या सिनेमामध्ये केवळ माधुरी दीक्षित आहेत; म्हणून आयुष्यात पहिल्यांदा पंडितजींनी संजयलीला बन्साळी यांच्यासाठी ‘देवदास’ चित्रपटातील ‘काहे छेड मोहे’ या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले. त्यातील ‘अमूक ओळीतील अमूक शब्दावर माझा ताल चुकतो. नृत्य जमते; पण लय हरवते’, असे माधुरी यांनी पंडितजींना सांगितले. त्यावर पंडितजींनी स्मितहास्य केले. त्यांनी उजव्या पायावर घुंगरांच्या गुडघ्यांपर्यंत पट्ट्या चढवल्या. ते माधुरीला म्हणाले, ‘‘वरून तिसऱ्या ओळीतील डावीकडून पाचवे घुंगरू वाजवून दाखव.’ माधुरीने हसून असमर्थता दर्शवली; मात्र त्या वेळी वयाची ६० ओलांडल्यानंतरही पंडितजींनी बसल्या ठिकाणी ते करून दाखवले. त्यांनी त्यांच्या पायाच्या नसा अशा काही खेचल्या की, नेमके ते वरून तिसऱ्या ओळीतले डावीकडून पाचवे घुंगरू क्षणभर थिरकून शांत झाले. त्यानंतर त्यांनी केवळ पाय आणि पायाची बोटे हलवून घुंगरांमधून सप्तसूर – ‘सा रे ग म प ध नि सा’ काढून दाखवले. सेटवरचा प्रत्येक माणूस थक्क होऊन जागच्या जागी थिजलेला होता.’ – सिद्धार्थ अकोलकर (व्हॉट्सॅपवरून साभार)
(पायांत बांधलेल्या अनेक घुंगरांपैकी एक घुंगरू वाजवता येणे, हे कथ्थक नृत्याचे वैशिष्ट्य आहे. त्याच्या सातत्यपूर्ण अभ्यासानंतर एका टप्प्याला मानवाचे पायाच्या नसांवर नियंत्रण येते. असे नियंत्रण मिळवू शकणारे अत्यंत दुर्मिळ असतात. पंडित बिरजू महाराज त्यांपैकी एक होते !)