उत्पल मनोहर पर्रीकर यांची भाजपला सोडचिठ्ठी : पणजी मतदारसंघातून अपक्ष या नात्याने निवडणूक लढवणार
पणजी, २१ जानेवारी (वार्ता.) – गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांनी २१ जानेवारी या दिवशी भाजपच्या सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले आणि पणजी मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक अपक्ष या नात्याने लढवणार असल्याचे घोषित केले. उत्पल पर्रीकर यांनी २१ जानेवारी या दिवशी सायंकाळी उशिरा पणजी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
(सौजन्य : ABP MAJHA)
ते पुढे म्हणाले, ‘‘माझ्याकडे अन्य कुठलाही दुसरा पर्याय नसल्याने मी भाजपला सोडचिठ्ठी देऊन पणजी मतदारसंघातून अपक्ष या नात्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या सदस्यत्वाचे त्यागपत्र देणे ही एक केवळ औपचारिकता आहे; मात्र भाजपला नेहमी माझ्या ह्रदयात स्थान असणार आहे. मी अन्य कुठल्याही पक्षात जाणार नाही. मी मोठा धोका पत्करून नैतिक मूल्यांच्या संवर्धनासाठी झटत आहे. पणजी मतदारसंघातील मतदार यविषयी योग्य निर्णय घेतील. माझ्यासाठी हा एक कठीण पर्याय आहे; मात्र लोकांसाठी हा पर्याय मी निवडला आहे. माझ्या राजकीय कारकीर्दीची कुणीही चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण जनता माझ्यासमवेत आहे. भाजपने माझ्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध केले होते; मात्र मी राजकारणात एखादे पद किंवा सत्तेसाठी उतरलेलो नाही.’’