निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर २ कोटी ४४ लक्ष रुपयांचे साहित्य कह्यात !

  • अवैध मद्य, अमली पदार्थ आणि किमती वस्तू यांचा समावेश
  • निवडणुकीच्या काळात अशा साहित्याची रेलचेल वाढणे लज्जास्पद !
प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, २१ जानेवारी (वार्ता.) :  गोव्यात १४ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर आजपर्यंत अवैध मद्य, अमली पदार्थ आणि वस्तू मिळून एकूण २ कोटी ४४ लक्ष रुपये किमतीचे साहित्य कह्यात घेण्यात आले आहे. गोव्यात ८ जानेवारीपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केली. ते पुढे म्हणाले, ‘‘कह्यात घेतलेल्या साहित्यामध्ये १ कोटी ९८ लक्ष रुपये किमतीचे मद्य, २८ लक्ष ७५ सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ, १० लक्ष ५४ सहस्र रुपये किमतीच्या विशेष भेटवस्तू, ४ लक्ष ३९ सहस्र रुपये रोकड आणि २ लक्ष रुपये किमतीचे सोने आदी मौल्यवान वस्तू यांचा यात समावेश आहे. आतापर्यंत १ सहस्र ७०० जणांना प्रतिबंधात्मक कारवाई या नात्याने कह्यात घेतले आहे, तर ६ गुन्हेगारांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत आणि अन्य १०१ जणांवर निरनिराळ्या स्वरूपाचे गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत.’’