गोव्यातील भाजपच्या उमेदवारांच्या सूचीतील ५ उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे अदखलपात्र गुन्हे नोंद
पणजी : भाजपने घोषित केलेल्या पहिल्या उमेदवारांच्या सूचीतील ५ उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे अदखलपात्र गुन्हे नोंद आहेत आणि यांमधील ५ पैकी २ उमेदवार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारमध्ये मंत्रीपद भूषवत आहेत. हे गुन्हे न्यायालयात सिद्ध झाल्यास त्यांना ५ किंवा त्याहून अधिक वर्षे कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
शासनातील कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे (प्रियोळ मतदारसंघाचे उमेदवार), आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (वाळपई मतदारसंघाचे उमेदवार), महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात (ताळगाव मतदारसंघाच्या उमेदवार), बाबूश मोन्सेरात (पणजी मतदारसंघाचे उमेदवार) आणि निळकंठ हळर्णकर (थिवी मतदारसंघाचे उमेदवार) यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. मंत्री गोविंद गावडे यांच्या विरोधात सर्वाधिक म्हणजे ३ प्रकरणे, तर बाबूश मोन्सेरात, मंत्री विश्वजीत राणे आणि निळकंठ हळर्णकर यांच्या विरोधात प्रत्येकी २, तर मंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्या विरोधात एक प्रकरण नोंद आहे. खून करणे, बलात्कार करणे, अपहरण करणे, भ्रष्टाचार अशा स्वरूपाचे गुन्हे या ५ जणांच्या विरोधात नोंद आहेत. सर्वोच्च न्यायालयाने लोकप्रतिनिधींच्या विरोधातील गुन्हेगारी स्वरूपाचे खटले जलद गतीने सोडवण्याचा आदेश दिलेला असला, तरी पणजी पोलीस ठाण्यावर वर्ष २००८ मध्ये करण्यात आलेल्या आक्रमणाच्या प्रकरणी तरी असे होतांना दिसत नाही. (१३ वर्षे राज्याच्या राजधानी पोलीस ठाण्यावरील आक्रमणाच्या प्रकरणी निकाल लागत नाही आणि दोषींना शिक्षा होत नाही, तर सर्वसामान्यांवरील आक्रमणावर निकाल लागण्यास किती कालावधी लागेल ? सर्व यंत्रणाच एकतर आक्रमणकर्त्यांच्या दबावाखाली आहे किंवा ती निष्क्रीय आहे, असेच म्हणावे लागेल ! – संपादक) या प्रकरणी मोन्सेरात दापंत्यासह एकूण ३५ जणांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट झालेले आहे.