श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा
अध्यक्षांच्या सोयीसुविधांवर होणारा खर्च श्री साईबाबा संस्थानच्या निधीतून देण्याचा सरकारी आदेश
|
नगर – शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त व्यवस्था समितीचे अध्यक्ष आशुतोष काळे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना राज्यमंत्र्यांप्रमाणेच सर्व सोयीसुविधा मिळणार आहेत. त्यानुसार त्यांना प्रतिमास ७ सहस्र ५०० रुपयांचे मानधन आणि इतर खर्चही मिळणार आहे. हा खर्च आणि संबंधित सोयीसुविधा यांवर होणारा व्यय श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्या निधीतून देण्यात येईल, असे सरकारच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या सोयीसुविधांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे…
१. प्रतिमास ७ सहस्र ५०० रुपये मानधन, तसेच समितीच्या बैठकीला उपस्थित रहाण्यासाठी प्रत्येक बैठकीमागे ५०० रुपयांचा भत्ता
२. प्रत्येक मासाला ३ सहस्र रुपयांपर्यंतचा दूरभाष खर्च
३. कार्यालयीन कामासाठी वाहन सुविधेवरील व्ययही देण्यात येणार असून त्यात समितीने वाहन दिल्यास इंधन खर्च म्हणून प्रतिवर्षी ७२ सहस्र रुपये
४. अध्यक्षांनी स्वतःचे वाहन वापरल्यास त्यांना प्रतिमास १० सहस्र रुपये
५. संचालक मंडळाच्या बैठकीनिमित्त मुंबईला गेल्यास प्रतिदिन ७५० रुपये
६. नागपूर, संभाजीनगर, पुणे, नाशिक येथे गेल्यास प्रतिदिन ५०० रुपयांचा खर्च, तसेच इतर ठिकाणी गेल्यास प्रतिदिन ३५० रुपयांचा खर्च
७. अध्यक्षांना नियमाप्रमाणे दैनिक भत्ता, तसेच कार्यालयीन कामासाठी एक स्वीय साहाय्यक, एक लिपिक, एक शिपाई हे कर्मचारी असतील.
८. समितीच्या दौर्यात शासकीय विश्रामगृहावर मुक्कामाची सोय असेल. या वेळी वाहनाची सुविधा असेल; मात्र इतर ठिकाणी समितीच्या निधीमधून निवासस्थानाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार नाही.