यापुढे कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमाला अनुमती दिल्यास विरोध करू ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना
मुंबई – वर्ष १८१८ मध्ये कोरेगाव भीमा येथे झालेले युद्ध जातीय नव्हते. इंग्रजांनी केलेला हा शुद्ध अपप्रचार आहे. समकालीन संदर्भ आणि पुरावे पडताळले असता हे सिद्ध होते. इंग्रजांनी ही भारतियांविरुद्ध केलेली लढाई होती. त्यामुळे कोरेगाव भीमा येथे प्रतिवर्षी १ जानेवारी या दिवशी होणार्या कार्यक्रमाला सरकारने अनुमती देऊ नये. अन्यथा आम्ही याचा विरोध करू, अशी चेतावणी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजयसिंह सेंगर यांनी दिली आहे. यापुढे जे समाजकंटक देशद्रोही इंग्रजांची उघडपणे बाजू घेऊन ही लढाई ‘पेशवे विरुद्ध दलित’ अशी असल्याचा खोटा जातीयवादी इतिहास सांगतील, त्यांना कारागृहात डांबण्यात यावे, अशी मागणीही श्री. सेंगर यांनी केली आहे.
याविषयी श्री. अजयसिंह सेंगर यांनी प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे की,
१. कोरेगाव भीमा लढाईची सत्य माहिती पुराव्यासह देणारे लेखक आणि अधिवक्ता रोहन माळवदकर यांचे ‘१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक शंभर टक्के सत्य इतिहास सांगणारे आहे. महाराष्ट्र करणी सेना रोहन माळवदकर यांच्या समवेत आहे.
२. कोरेगाव भीमाच्या लढाईत महार रेजिमेंट सहभागी नव्हती. या लढाईत इंग्रजांकडून ‘सेकंड बटालियन फर्स्ट बॉम्बे नेटिव्ह इंफंट्री’, ‘द पूना ऑक्झीलरी हॉर्स’ आणि ‘मद्रास आर्टिलरी’ अशा ३ युनिट्स लढल्या. महार रेजिमेंटची स्थापना वर्ष १९४१ यावर्षी झाली.
३. इंग्रज हेच जातीयवादी होते, हे आमच्यापासून लपवले गेले. इंग्रजांनी सैन्यासाठी दिलेल्या विज्ञापनांमध्ये ‘खालच्या जातीच्या सैनिकांना प्रवेश नाही’, असे म्हटले होते. (संदर्भ ग्रंथ – पूना हॉर्सेस)
४. दलित नेते मात्र प्रसिद्धीमाध्यमांपुढे ‘पेशवे जातीयवादी होते’, असे सांगतात, हे योग्य नाही.