संभाजीनगर येथील ‘द जैन इंटरनॅशनल शाळे’चे नाव काळ्या सूचीत !
शिक्षण उपसंचालकांचे आदेश !
संभाजीनगर – शहानूरमियाँ दर्गा परिसरातील ‘द जैन इंटरनॅशनल शाळे’ला शिक्षण विभागाने काळ्या सूचीत घातले आहे. ‘द जैन इंटरनॅशनल शाळे’च्या आवारात पुस्तके आणि लेखनसाहित्य यांची विक्री केल्याची तक्रार अमित कासलीवाल यांसह इतर ३ पालकांनी जिल्हा बाल हक्क परिषद अन् शिक्षण विभाग यांच्याकडे केली होती. अशा शाळांवर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. शिक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर तक्रारकर्त्या पालकांचे विद्यार्थी इयत्ता १लीच्या वर्गात असल्याचे आढळून आले होते. त्यांना शाळेत पुस्तके खरेदीसाठी ४ सहस्र ७०० रुपये भरल्याची पावती दिली होती. दिलेली पावती आणि प्रत्यक्ष घेतलेली रक्कम यांत १ सहस्र ४१७ रुपये अधिक घेतल्याचे निदर्शनास आले. पावतीवर कुठल्याही प्रकारचा जी.एस्.टी. क्रमांक नमूद करण्यात आला नसल्याचे चौकशी समितीला आढळून आले होते. त्यानुसार वरील कारवाई केली.