प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ हा उपक्रम राबवण्याविषयी कोल्हापूर प्राथमिक शिक्षण विभागाचे सर्व गट शिक्षणाधिकार्यांना पत्र
|
कोल्हापूर, २१ जानेवारी (वार्ता.) – प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ हा उपक्रम राबवण्यासाठी सोबत जोडलेल्या परिपत्रकास अनुसरून सर्व शाळांना सदरचे परिपत्रक निदर्शनास आणून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयाला द्यावा, असे पत्र कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सर्व गटशिक्षणाधिकार्यांना पाठवले आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सर्व गटशिक्षणाधिकार्यांना पाठवलेले पत्र –
हिंदु जनजागृती समितीने १३ जानेवारी या दिवशी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी, तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात निवेदन दिले होते. त्याची नोंद घेत प्राथमिक शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकार्यांना हे पत्र पाठवले असून या पत्रासमवेत समितीने दिलेल्या निवेदनाची प्रतही जोडली आहे. (हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या निवेदनाची नोंद घेत गटशिक्षणाधिकार्यांना त्यावर कार्यवाही करण्याचे पत्र पाठवणार्या कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाचे अभिनंदन ! याचप्रकारे अन्य जिल्ह्यांनीही त्यांच्या स्तरावर अशाप्रकारचे पत्र काढून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहिमेत सहभागी होऊन राष्ट्रकर्तव्य पार पाडावे, अशी अपेक्षा ! – संपादक)
हिंदु जनजागृती समितीने दिलेली पत्रे –
(पत्र वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)
गटशिक्षणाधिकार्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात; मात्र हेच राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचरापेटीत आणि गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. अशा प्रकारे राष्ट्रध्वजाची विटंबना होऊ नये; म्हणून हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली होती. तिची सुनावणी करतांना न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्याचा सरकारला आदेश दिला. त्यानुसार केंद्र अन् राज्य गृह विभाग, तसेच शिक्षण विभाग यांनी याविषयीचे परिपत्रकही काढले आहे.
१३ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीने प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. आशा उबाळे आणि माध्यमिक शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी व्ही.एस्. ओतारी यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी परिपत्रक काढून सर्व गट शिक्षणाधिकार्यांना कळवण्याचे आश्वासन दिले, तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनीही या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, श्री. दीपक कातवरे आणि श्री. अजित सुस्वरे उपस्थित होते. |