सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी कुक्के सुब्रह्मण्य (कर्नाटक) येथील श्री सुब्रह्मण्य मंदिरात केलेल्या देवदर्शनाचा वृत्तांत !
‘१०.७.२०२० या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी कर्नाटक राज्यातील कुक्के सुब्रह्मण्य (दक्षिण कन्नड) येथील श्री सुब्रह्मण्य याच्या मंदिरात जाऊन साधकांसाठी प्रार्थना केली.
१. श्री सुब्रह्मण्य मंदिर, कुक्के सुब्रह्मण्य, जिल्हा दक्षिण कन्नड, कर्नाटक.
१ अ. श्री सुब्रह्मण्य मंदिराचा इतिहास : दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कुमारधारा नदीच्या काठी ‘कुक्के’ नावाचे गाव आहे. कुक्के गावाच्या दक्षिणेला कुमारपर्वत आहे. हे कुमारधारा नदीचे उगम स्थान आहे. तारकासुराचा वध केल्यानंतर देवांचा सेनापती कार्तिकेय कुमारपर्वतावर आला. याच पर्वतावर इंद्राची कन्या देवसेना हिचा विवाह कार्तिकेयाशी झाला.
जनमेजय राजाने चालू केलेल्या सर्पयज्ञापासून रक्षण होण्यासाठी वासुकि कुक्के येथे आला आणि एका बिळात जाऊन बसला. वासुकीला पकडायला गरुड आल्यावर वासुकीने बिळात राहून कार्तिकेयाची आराधना (तपश्चर्या) केली. कार्तिकेयाने वासुकीला अभय दिल्याने गरुडाला काही करता आले नाही. खरेतर कुक्के हे वासुकीचे क्षेत्र आहे, तर कुमारपर्वत हे कार्तिकेयाचे स्थान आहे; पण कार्तिकेयाने वासुकीचे रक्षण केल्यावर कार्तिकेय कुक्के येथे ‘सुब्रह्मण्य’ या रूपात स्थिर झाले. कुक्के सुब्रह्मण्य मंदिराच्या मागच्या बाजूला ‘आदि सुब्रह्मण्य’ नावाचे स्थान आहे. या ठिकाणी एक वारूळ आहे. त्याला मूळ स्थान मानले जाते. या वारुळाची मृत्तिका प्रसाद म्हणून भक्तांना देण्यात येते.
२. कुक्के सुब्रह्मण्य येथील दैवी प्रवासाच्या वेळी घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी !
२ अ. सप्तर्षींनी कुक्के सुब्रह्मण्य येथे पोचण्यापूर्वी लागणार्या अरण्यात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना डाव्या पायाखाली लिंबू चिरडण्यास सांगणे आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तसे करणे : कुक्के सुब्रह्मण्य येथे जायला निघाल्यावर सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथनजी यांच्या माध्यमातून सांगितले, ‘‘सुब्रह्मण्य मंदिराच्या ४ – ५ कि.मी. अलीकडे लागणार्या अरण्यप्रदेशातून गाडी जात असतांना गाडी थांबवून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी एक उपाय करावा. गाडीतून उतरून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांच्या डाव्या पायाखाली एक लिंबू चिरडावे.’’ श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे केले.
२ आ. कुक्के सुब्रह्मण्य येथून परत येतांना प्रवासात मुंगूस दिसणे आणि काही वेळाने साप दिसणे, तेव्हा ‘सनातन संस्था अन् साधक यांच्यावर आलेले एक संकट टळले आहे’, असे सप्तर्षींनी सांगणे : त्यानंतर सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन यांच्या माध्यमातून कळवले, ‘‘सुब्रह्मण्य येथून परतीच्या प्रवासात साप दिसेल. तो साप गाडीच्या अगदी जवळ येईल. त्या वेळी लक्ष असू दे.’’ परतीच्या प्रवासात सुब्रह्मण्य येथून ४ – ५ कि.मी. दूर आल्यावर आरंभी आम्हाला डावीकडून उजवीकडे जाणारे एक मुंगूस दिसले. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडून डावीकडे जाणारा एक साप दिसला आणि तो साप गाडीच्या अगदी जवळून गेला. याविषयी सप्तर्षींना कळवल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘साप दिसण्याच्या आधी मुंगूस दिसले, म्हणजे सनातन संस्था आणि साधक यांच्यावर आलेले एक संकट दूर झाले आहे.’’
३. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सुब्रह्मण्य येथील श्री नरसिंह मठात जाऊन श्री श्री विद्याप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांची भेट घेणे आणि त्यांनी प्रसादरूपात मूळ वारुळाची मृत्तिका देणे
सुब्रह्मण्य येथे देवाचे दर्शन झाल्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कुक्के सुब्रह्मण्य येथील श्री नरसिंह मठात जाऊन पिठाधिपती श्री श्री विद्याप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांची भेट घेऊन हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी त्यांचे आशीर्वाद घेतले. त्या वेळी स्वामींनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना प्रसादरूपात मूळ वारुळाची मृत्तिका दिली.
या आधी आम्ही श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत २ – ३ वेळा कुक्के सुब्रह्मण्य येथे जाऊनही आम्हाला या स्थानाचे दर्शन झाले नव्हते. या वेळी स्थानिक धर्मप्रेमींच्या साहाय्याने आम्हाला या स्थानाचे दर्शन झाले.’
– श्री. विनायक शानभाग, मुल्की, कर्नाटक. (१०.७.२०२०)