अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील ‘हत्तीखाना’ लेणीचे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांनी जातीने लक्ष घालून संवर्धन करावे !
अंबाजोगाई (जिल्हा बीड), २० जानेवारी (वार्ता.) – येथील श्री योगेश्वरीदेवी मंदिराच्या उत्तरेस जोगाई सभामंडप लेणी ही ‘हत्तीखाना’ लेणी नावाने प्रसिद्ध आहे; मात्र सध्या त्या ठिकाणी मद्याच्या बाटल्या पडलेल्या दिसतात. येथे मद्यपी येऊन अस्वच्छता पसरवत असल्याने परिसरात दुर्गंधी आहे, तसेच या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव आहे. त्यामुळे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांनी याकडे जातीने लक्ष घालून लेण्यांच्या ठिकाणची स्वच्छता आणि संवर्धन करावे, तसेच श्री अंबाजोगाईदेवीच्या मंदिरात लेण्यांविषयी फलक लावून नागरिकांना त्या पहाण्याची विनंती करावी, अशी मागणी सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. शरद फडके यांनी केली आहे. (कार्यकर्त्यांना अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)
या मागणीसाठी श्री. शरद फडके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे, तसेच सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्यक विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. या पत्रामध्ये म्हटले आहे की, अंबाजोगाई येथील बाराव्या शतकातील प्राचीन जोगाई सभामंडप लेणी ही ‘हत्तीखाना’ नावाने प्रसिद्ध असून सध्या तेथे स्वच्छतेचा पुष्कळ अभाव आहे. या ठिकाणी असलेले ४ मोठे दगडी हत्तीचे पुतळेही सध्या विद्रुप अवस्थेत आहेत. मागील अनेक वर्षांपासून या लेणीची कोणत्याही प्रकारची डागडुजी केलेली नाही.
जोगाई सभामंडप (हत्तीखाना) विषयी थोडक्यात माहिती !जोगाई सभामंडप (हत्तीखाना) ही लेणी चौकोनी आकाराची असून खडकामध्ये खोलवर कोरलेली आहे. लेणीचा मंडप ८.३६ मीटर असून समोर खुले प्रांगण आहे. लेणीच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे २ भव्य पुतळे आहेत. त्यामुळे या लेणीला ‘हत्तीखाना लेणी’, असे नाव पडले आहे. जोगाई सभामंडप लेणी हे स्मारक महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुरातन वास्तूशास्त्रविषयक स्थळे अन् अवशेष अधिनियम १९६० नुसार राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. |