राज्यातील शाळा, महाविद्यालये २४ जानेवारीपासून चालू करण्यास अनुमती
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची स्थिती चिंताजनक नसल्याचे लक्षात आल्यानंतर २४ जानेवारीपासून शाळा चालू करण्याचा प्रस्ताव शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवला होता. त्यानंतर आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे राज्यातील शाळा-महाविद्यालये २४ जानेवारीपासून चालू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावास सहमती दर्शवली असून स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे सर्व वर्ग चालू होणार आहेत.
तरीही शाळा किंवा महाविद्यालय चालू करतांना स्थानिक कोरोनाच्या संसर्गाची परिस्थिती आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य यांचा विचार करून स्थानिक प्राधिकरण निर्णय घेणार आहेत. याविषयी जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्त यांच्यावर मुख्य उत्तरदायी असणार आहे.
कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शाळा-महाविद्यालये चालू करण्यात आली होती; परंतु ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागताच जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात शाळा आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मुंबईतील शाळा २७ जानेवारीपासून चालू होण्याची शक्यता
मुंबई – येथील शाळा २७ जानेवारीपासून चालू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. सुरेश काकाणी म्हणाले की, मुंबईतही शाळा चालू करण्यासाठी महापालिका सकारात्मक आहे. मुंबईत ‘ऑफलाईन’बरोबरच ‘ऑनलाईन’ शाळाही चालू रहाणार आहेत. शाळा चालू ठेवण्यासाठी मागील वेळी जे नियम घोषित केले होते, तेच नियम या वेळीही लागू राहणार आहेत.