राज्यात १० दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक !
रक्ताच्या केवळ ४१ सहस्र पिशव्या उपलब्ध
नागपूर – सर्वत्र कोरोना आणि ‘ओमायक्रॉन’ची साथ असतांना रक्तदानाचा वेग कमालीचा घसरल्यामुळे राज्यात आजघडीला केवळ १० दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक राहिला आहे. राज्यातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये मिळून केवळ ४१ सहस्र रक्ताच्या पिशव्यांचा साठा उपलब्ध आहे. परिषदेसाठी २२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र केवळ २ कोटी २० लाख रुपये मिळाले आहेत, अशी माहिती राज्य रक्तसंक्रमण परिषदेचे (एस्.बी.टी.सी.) सहसंचालक डॉ. अरुण थोरात यांनी १९ जानेवारी या दिवशी दिली.
ते पुढे म्हणाले की, राज्यात सध्या एकूण ३५० रक्तपेढ्या असून त्यांपैकी ७६ सरकारी आहेत. उर्वरित २७४ रक्तपेढ्यांमध्ये १३ ‘इंडियन रेडक्रॉस’च्या, १२ खासगी आणि विविध ट्रस्ट अन् स्वयंसेवी संस्था यांच्या आहेत. वर्ष २०२० मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तसंकलनासाठी केलेल्या आवाहनामुळे १५.४६ लाख युनिट रक्तसंकलन झाले होते. वर्ष २०२१ मध्ये अनुमाने १६ लाख युनिट रक्तपिशव्या संकलन झाले होते.