परमबीर सिंह-सचिन वाझे गुप्त भेटीप्रकरणी नवी मुंबई पोलिसांतील चार जणांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !
नवी मुंबई – माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह या दोन्ही आरोपींची चांदिवाल आयोगाच्या कार्यालयात गुप्त भेट झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या कैदी पार्टीतील चार अधिकारी आणि कर्मचारी यांना नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह काही दिवसांपूर्वी चांदीवाल आयोगासमोर उपस्थित झाले होते. तेव्हा परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची एका घंट्यासाठी भेट झाली होती, असे समोर आले आहे. भेटीची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले होते. आरोपी सचिन वाझे यांना तळोजा कारागृहातून मुंबई येथील चांदिवाल आयोगाच्या कार्यालयात सुनावणीसाठी घेऊन जाणारे कैदी पार्टीतील अधिकारी आणि कर्मचारी यांची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचारी यांना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असून १५ दिवसांत नोटिसीला उत्तर देण्याची मुदत दिली आहे.