एका संतांनी लक्षात आणून दिलेले नाडीपट्टीवाचकांनी साधना करण्याचे महत्त्व !
१. भृगु संहिता वाचनाचा वारसा वडिलोपार्जित आला असला, तरी संहिता वाचनासाठी स्वतःची साधनाही असणे अनिवार्य असणे
‘एका राज्यातील एक भृगु संहिता-वाचक भृगु संहितेचे वाचन करतात. त्यांना त्यांच्या वडिलांकडून हा दैवी वाचनाचा वारसा मिळाला आहे. पूर्वी भृगु महर्षींनी भूर्जपत्रावर येणार्या काळाविषयी भविष्य लिहून ठेवले आहे. याला ‘भृगु संहिता’ म्हणतात. अशी पुष्कळ भूर्जपत्रे सध्या एका राज्यात आहेत. भृगु संहिता वाचनाचा साधनेच्या दृष्टीने अभ्यास केल्यास काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. महर्षींनी काळचक्राची गती जाणून येणार्या काळासाठी जे अमूल्य भविष्यकथन भूर्जपत्रांवर लिहून ठेवले आहे, ते लिखाण समजून घेऊन महर्षींना अपेक्षित असे वाचन होण्यासाठी, जी साधना आवश्यक आहे, ती या संहिता-वाचकांनी वाढवणे अपेक्षित आहे. त्यांच्याकडे वाचनाचा वारसा वडिलोपार्जित आला असला, तरी संहिता वाचनासाठी स्वत:ची तेवढीच साधना असणेही तितकेच अनिवार्य आहे.
एक जीवनाडीपट्टीवाचक आहेत. त्यांनाही त्यांच्या वडिलांकडूनच नाडीवाचनाचा हा दिव्य वारसा मिळाला आहे. ‘या नाडीपट्टीवाचकाचा वाचनाचा अनेक वर्षांचा अनुभव, महर्षींवरील नितांत श्रद्धा आणि त्यांची स्वतःची साधना यांमुळे भृगु संहिता वाचकाच्या तुलनेत या नाडीपट्टीवाचकाचे वाचन हे ९० टक्के योग्य असते आणि संहिता वाचकाचे वाचन ५० टक्के योग्य असते’, असे एका संतांनी सांगितले.
२. नाडीपट्टीवाचन करणार्याची साधना चांगली असेल, तर त्याच्यावर ईश्वरी कृपाही असणे
अन्य सूत्रांसमवेतच नाडीपट्टीवाचन, संहितावाचन आणि ज्योतिषशास्त्र अशा प्रकारचे अन्य कोणी अन्य शास्त्र जाणत असल्यास ‘त्या व्यक्तीला आध्यात्मिक त्रास कितपत आहे ? त्याचा भाव किती आहे ? त्याची स्वतःची साधना किती आहे ?’ यांवरही वाचनाच्या टक्केवारीची अचूकता अवलंबून असते. या सर्वांमध्ये एकमेव उच्चतम सूत्र म्हणजे वाचकाची साधना चांगली असेल, तर त्याच्यावर ईश्वरी कृपाही तितकीच असते.
३. ‘वाचन करतांना आपला भाव असेल आणि साधना असेल, तर भगवंताला आपल्याला काय सांगायचे आहे ?’, हे अंतःप्रेरणेनेही नाडीवाचकाला कळू शकते.
४. ईश्वराच्या आशीर्वादाचे महत्त्व !
यावरूनच लक्षात येते की, अध्यात्मात कोणतीही कृती असो, ती ईश्वराप्रती असलेल्या भावासहितच केली पाहिजे, तरच या कृतीतून निष्पन्न होणारे फलित हे १०० टक्के असते; कारण या कृतीला ईश्वराचा आशीर्वाद लाभलेला असतो आणि तोच जीवनात महत्त्वाचा असतो.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (३.४.२०२०)