साधना आणि परात्पर गुरुदेवांची अपार कृपा यांमुळे कठीण प्रसंगात स्थिर रहाणार्‍या पुणे येथील श्रीमती शैलजा खोपडे (वय ५६ वर्षे) !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. गुरुलीला सत्संग आणि व्यष्टी आढावा यांमुळे साधनेला खर्‍या अर्थाने गती मिळणे अन् साधनेमुळे झालेला पालट कुटुंबियांनाही जाणवू लागणे

‘माझ्यात ‘भावनाशीलता’ हा दोष पुष्कळ प्रमाणात होता. वर्ष २०२० मध्ये दळणवळण बंदीच्या काळात ‘ऑनलाईन’ सत्संग आणि व्यष्टी आढावा (पुणे जिल्ह्यात दळणवळण बंदीपासून, म्हणजे एप्रिल २०२० पासून सर्व साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना अधिक चांगली व्हावी, यांसाठी सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) प्रतिदिन ‘ऑनलाईन’ सत्संग घेतात. ‘सौ. मनीषाताईंनी सांगितलेल्या सूत्रांवर कशा प्रकारे प्रयत्न केले ?’, हे साधक नंतरच्या सत्संगात सांगतात.) यांमुळे माझी साधना खर्‍या अर्थाने चालू झाली आणि साधनेला चांगली गती मिळाली. गुरुकृपेमुळे माझ्यात झालेले पालट माझ्या कुटुंबियांनाही जाणवू लागले.

श्रीमती शैलजा खोपडे

२. लहान भावाच्या निधनाच्या वेळी स्थिती गंभीर होऊन सहन न होणे आणि त्या वेळी साधिका खर्‍या अर्थाने साधना करत नसणे

दीड वर्षापूर्वी, म्हणजे ४.१.२०१९ या दिवशी माझ्या लहान भावाचे (श्री. गणेश आनंदराव कदम (वय ४८ वर्षे, याचे) हृदयविकाराने निधन झाले होते. त्या वेळी माझी स्थिती फारच गंभीर होती. ‘माझ्या भावाचे निधन झाले’, हे मला सहन होत नव्हते. त्या वेळी मी खर्‍या अर्थाने साधना करत नव्हते.

३. कोरोनामुळे आईचे निधन होणे आणि मोठ्या भावालाही कोरोना झाला असल्याने घरात गंभीर परिस्थिती असतांनाही साधनेमुळे शांत रहाता येणे अन् त्या वेळी केवळ गुरुदेवांचे स्मरण होणे

१५.१०.२०२० या दिवशी माझी आई श्रीमती मालन आनंदराव कदम (वय ७२ वर्षे) हिचे कोरोनामुळे निधन झाले. त्या रात्री पावणे बारा वाजता माझ्या मोठ्या भावाचा (श्री. दीपक आनंदराव कदम) मला भ्रमणभाष आला. त्यानंतर मी आणि माझी सून (सौ. सायली विक्रम खोपडे) आम्ही दोघी माझ्या माहेरी गेलो. तेव्हा तिथे माझ्या लहान भावाची बायको (श्रीमती सोनाली गणेश कदम) आणि तिची दोन्ही मुले (कु. रूद्रनील गणेश कदम अन् कु. आर्या गणेश कदम) रडत होती. आईचे निधन झाल्याचे समजल्यावर मी एकदम स्थिर आणि शांत होते. त्या वेळी माझ्या मोठ्या भावालाही कोरोना झाला होता. त्यामुळे घरात गंभीर परिस्थिती असतांनाही मला साधनेमुळे शांत रहाता आले. रात्री सर्व जण रुग्णालयात गेल्यानंतर मी दोन्ही लहान भाच्यांजवळ थांबले. त्या वेळी माझ्याकडून केवळ गुरुदेवांचेच स्मरण होत होते.

४. आईच्या पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर पहाटे घरी येणे आणि लगेच पहाटेच्या नामजप सत्संगासाठी बसल्यामुळे मुलाला पुष्कळ कौतुक वाटणे

आईच्या पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर मी सद्गुरु (कु.) स्वातीताई शुक्रवारी घेत असलेल्या पहाटेच्या नामजप सत्संगासाठी बसले. त्या वेळी ‘मी आई गेल्याचे दु:ख असूनही नामजप सत्संगासाठी बसले’, याचे माझ्या मुलाला (श्री. विक्रम शरद खोपडे) फार कौतुक वाटले. त्या वेळी आमच्या घरात ‘काहीच झाले नाही’, असे वातावरण होते. या सगळ्यात केवळ गुरुदेवांमुळेच मला शक्ती मिळाली. असे माझे गुरुदेव महान आहेत.’

– श्रीमती शैलजा खोपडे, सिंहगड रस्ता, पुणे. (८.५.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक