६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. रेखा माणगावकर यांनी क्षणोक्षणी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील अस्तित्व !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. व्यष्टी आणि समष्टी साधना करतांना अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील अस्तित्व !

अ. मी सकाळी ८ वाजता स्वयंसूचना सत्र करते. त्या वेळी मी सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) खोलीत जाऊन ‘आपणच माझ्याकडून प्रत्येक स्वयंसूचना सत्र करवून घ्या’, अशी प्रार्थना करते. त्या वेळी ‘प.पू. गुरुदेव माझ्याकडून स्वयंसूचना सत्र करवून घेत आहेत’, असे मला जाणवते.

आ. माझ्याकडे फोंडा येथील साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याची सेवा आहे. त्या वेळी ‘हा आढावा मी घेत नसून प.पू. गुरुदेव माझ्या माध्यमातून घेत आहेत आणि तेच सर्व सूत्रे सुचवत आहेत’, असे मला जाणवते.

इ. पूर्वी मला प.पू. गुरुदेवांना सगुणातून भेटण्याची उत्सुकता असायची; परंतु आता ‘प.पू. गुरुदेव माझ्या हृदयात आहेत’, असे वाटून त्यांना सगुणातून भेटण्याची आवश्यकता वाटत नाही.

सौ. रेखा माणगावकर

२. रुग्णाईत स्थितीत सूक्ष्मातून अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व

२ अ. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तपासणी केल्यावर ‘हृदयाशी संबंधित काही त्रास नाही’, असे आधुनिक वैद्यांच्या लक्षात येणे : ऑक्टोबर २०२० मध्ये मला श्वास घ्यायला त्रास होत होता; म्हणून आधुनिक वैद्य घरी येऊन मला तपासून गेले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझा ‘इसीजी’ काढला आणि रक्त तपासणी केली. तेव्हा ‘मला हृदयाशी संबंधित काही त्रास नाही’, असे त्यांच्या लक्षात आले.

२ आ. खासगी रुग्णालयात रक्त तपासणीसाठी जातांना प.पू. गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर त्यांनी सूक्ष्मातून ‘अहवाल सर्वसाधारण येईल’, असे सांगणे : रात्री १० वाजता मला ‘इसीजी’ काढण्यासाठी आणि रक्त तपासण्यासाठी एका खासगी रुग्णालयात जावे लागले. त्या वेळी माझ्याकडून प.पू. गुरुदेवांना ‘हे धन आपलेच आहे; परंतु त्याचा अनावश्यक व्यय होऊ नये’, अशी प्रार्थना झाली. तेव्हा प.पू. गुरुदेवांनी सूक्ष्मातून ‘तुम्ही रक्त तपासणी करून घ्या. त्याचा अहवाल सर्वसाधारण येईल’, असे सांगितले. त्या वेळी मी मनात येणारे विचार प.पू. गुरुदेवांच्या चरणी अर्पण केले. सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांनी ‘घाबरण्याची आवश्यकता नाही’, असे मला सांगितले.

माझ्यावर वैद्यकीय उपचार चालू होते. मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय करत होते. त्या वेळी ‘प.पू. गुरुदेव सतत माझी काळजी घेत आहेत’, असे मला जाणवत होते. त्यामुळे मला होत असलेला त्रास न्यून झाला.

‘गुरुदेवा, हे सर्व प्रसंग तुम्हीच मला अनुभवायला दिलेत आणि लिहून घेतलेत’, त्यासाठी तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. रेखा माणगावकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१२.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक