कामाचे देयक संमत करण्यासाठी लाच मागणार्‍या वन परिक्षेत्रीय अधिकार्‍याला अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

जळगाव – शासकीय कामाचा मोबदला देण्यासाठी कंत्राटदाराकडून २ कामांची देयके संमत करण्यासाठी १ लाख १५ सहस्र रुपयांची लाच मागणारे येथील वन परिक्षेत्रीय अधिकारी मुकेश महाजन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १८ जानेवारी या दिवशी अटक केली आहे. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असून ते शासकीय कंत्राटदार आहेत. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील वनविभागाकडून रावेर तालुक्यात ए.एन्.आर्. रोपवन अंतर्गत प्रवेशद्वाराचे काम ‘ऑनलाईन’ ई निविदाच्या पद्धतीने घेतले होते. यापैकी त्यांनी ३ कामे पूर्णही केली होती. यातील २ कामांचा त्यांना अद्याप धनादेश मिळालेला नव्हता. धनादेशाच्या मोबदल्यात मुकेश महाजन यांनी ५ टक्के कमिशनप्रमाणे १ लाख ३० सहस्र रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती १ लाख १५ सहस्र रुपये द्यायचे ठरले होते.