नवी मुंबईत ६० लाख रुपये किमतीचा गुटखा कह्यात, ७ जणांना अटक
राज्यात गुटखाबंदी असतांना गुटखा पकडण्यासाठी मोहीम का राबवावी लागते ? पोलीस त्यापूर्वीच अशा कारवाया का करत नाहीत ? – संपादक
नवी मुंबई, १९ जानेवारी (वार्ता.) – ‘नशामुक्त नवी मुंबई’ या अभियानाच्या अंतर्गत नवी मुंबई कक्ष ३ गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या पथकाने ६० लाख ७२ सहस्र रुपये किमतीचा गुटखा ४ टेम्पोसह कह्यात घेतला आहे. या प्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
महापे औद्योगिक वसाहतीत पुष्कळ प्रमाणात गुटख्याचा साठा करण्यात आला असून त्याची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार टाटा मोटर्स परिसरातील एका गोडाऊनजवळ चार टेम्पोंमध्ये विमल गुटखा आढळून आला. त्यावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी राहुल ताकाटे यांच्यासह धाड टाकण्यात आली. तेथून ४ टेम्पोंसह ४२ लाख ७२ सहस्र रुपये किमतीचा विमल गुटखा कह्यात घेण्यात आला.
या गुन्ह्यात इसरार अहमद नियाज अहमद शेख, सूरज हरिश ठक्कर, सस्तु रामेत यादव, नितीन बाबूराव कसबे, नौरुद्दीन अलिशौकत सय्यद, महंमद नफिस रफिक शेख, पवनकुमार पन्नालाल श्रीवास्तव यांना अटक करण्यात आली आहे. हा गुटखा आरोपी परराज्यातून छुप्या मार्गाने अल्प दराने खरेदी करून महापे येथे साठा करून ठेवत होते. त्यानंतर तेथून तो नवी मुंबई, मुंबई, ठाणे परिसरातील व्यावसायिकांना अधिक दराने विकल्याचे उघड झाले आहे.