मुक्तीदिन कि मोकळे रान ?
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील सेवेकर्यांचे हक्क आणि अधिकार नाकारून महाराष्ट्र मंदिर अधिनियमास सर्वाेच्च न्यायालयाने मान्यता दिल्याच्या घटनेस ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे १७ जानेवारी या दिवशी पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर मुक्तीदिन’ साजरा करण्यात आला. १५ जानेवारी २०१४ या दिवशी सर्वाेच्च न्यायालयाच्या अंतिम निकालानंतर ‘महाराष्ट्र टेंपल’ अधिनियमाअंतर्गत श्री विठ्ठल मंदिरातील बडवे, उत्पात आणि सेवाधारी यांचे अधिकार संपुष्टात आले. त्यानंतर १७ जानेवारी या दिवशी मंदिर पूर्णपणे सरकारच्या कह्यात गेले.
पुरो(अधो)गामी संघटनांना श्री विठ्ठलाच्या मंदिराचे सरकारीकरण झाल्यानंतर जो आनंद झाला, जो उत्साह वाढला, तो उत्साह मंदिरातील सर्व परंपरा-पावित्र्य टिकवण्यासाठी, तसेच मंदिर सरकारीकरण झाल्यानंतर तेथे होत असलेले अन् झालेले अपहार रोखण्यासाठी कधी दिसला नाही. मंदिराच्या नावावर असलेल्या शेकडो एकर भूमीचा पत्ताच नाही, हा भूमी घोटाळा समोर येऊन मंदिराला ती भूमी पुन्हा प्राप्त व्हावी, यासाठी आंदोलन करतांना हे पुरोगामी कधी दिसले नाहीत किंवा त्याविषयी एकही जण बोलत नाही. प्रक्षाळपूजेच्या वेळी श्री विठ्ठलाला स्नान घालतांना चेष्टा-मस्करीमध्ये मंदिर व्यवस्थापकांनाही गाभार्यात स्नान घालतांनाचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. याचा निषेध करतांना पुरोगामी कधी दिसले नाहीत. मंदिरातील गोशाळेला भक्तांनी श्रद्धापूर्वक दान दिलेल्या गायी मंदिर समितीने कसायांना विकल्याचा संशय आहे, याविषयी संघटनांनी कधी आंदोलन केले नाही ना कधी निवेदन दिले, मग मंदिर मुक्तीचा अर्थ पुरोगाम्यांच्या दृष्टीने काय आहे ? कि मंदिरातील धनाचा मनमानी पद्धतीने वापर करता येत असल्याने यांना मोकळे रान मिळाले असल्याचा आनंद होत आहे, असे भाविकांना वाटल्यास चूक ते काय ?
भाव तिथे देव ! त्यामुळे मंदिराचे पुजारी आणि व्यवस्थापक भक्तच असायला हवेत. स्वार्थी व्यक्ती मंदिराचे व्यवस्थापन पारदर्शकपणे पाहू शकेल का ? त्यामुळे श्री विठ्ठल मंदिराचा मुक्ती दिवस साजरा करणे म्हणजे या संघटनांनी स्वत:च्या बौद्धिक दिवाळखोरीचे घडवलेले दर्शनच आहे. जर मंदिरांविषयी पुरोगामी म्हणवणार्या संघटनांना कळवळा असेल, तर त्यांनी श्री विठ्ठल मंदिर सरकारच्या कह्यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत; कारण लाखो विठ्ठलभक्त श्री विठ्ठल मंदिराला सरकारीकरणाच्या जोखडातून मुक्त झाल्याचे पहाण्यासाठी आतुरलेले आहेत.
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर