सांस्कृतिक वारसा जपणार्या केंद्राला साहाय्य करणार ! – डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थराज्यमंत्री
संभाजीनगर येथील इस्कॉन मंदिर उभारणीचे कौतुक !
संभाजीनगर – भारताचा सांस्कृतिक वारसा जपणार्या आणि संभाजीनगरच्या इतिहासाला समृद्ध करणार्या केंद्रास साहाय्य करणार आहे, असे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी १७ जानेवारी या दिवशी दिले. गट क्रमांक २३१, वरूड फाटा येथे इस्कॉनचे श्री श्री राधा निकुंजबिहारी मंदिर, इस्कॉन-वैदिक शिक्षण आणि सांस्कृतिक केंद्राचे निर्माण कार्य चालू आहे. या मंदिराच्या निर्माणस्थळी डॉ. कराड यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी चालू असलेल्या निर्माण कार्याचा आढावा घेतला.
मंदिराच्या भव्य वास्तूची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे कार्य प्रसिद्ध आर्किटेक्ट राजन नाडकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून विराज कन्स्ट्रक्शन हे आर्.सी.सी. काम करत आहेत. हरे कृष्ण महामंत्राच्या गजरात अतिथींच्या हस्ते जगन्नाथ बलभद्र सुभद्रेची आरती करण्यात आली. पुष्पहार, महाप्रसाद, भगवद्गीता आणि श्री राधाकृष्णाची प्रतिमा भेट देऊन डॉ. कराड यांचा सत्कार करण्यात आला, तसेच उद्योजक विजय गोयल यांचाही सत्कार करण्यात आला. डॉ. जय हनुमान प्रभूंद्वारे आशीर्वचन झाल्यानंतर मंदिरासाठी ज्यांनी भूमी दान केली, असे सांगत उद्योजक राजेश भारूका यांनी दान देण्यामागील प्रेरणेचे कथन केले.
डॉ. गोपालकृष्ण सिंग म्हणाले, ‘‘समाजास सक्षम बनवण्यासाठी श्रेष्ठ व्यक्तींनी आध्यात्मिकतेला स्वीकारले पाहिजे.’’