अग्निहोत्र करतांना गरुडदेवाला आहुती देण्याचा विचार मनात येताच सूक्ष्मातून सुवर्ण रंगाचा गरुड वर घिरट्या घालतांना दिसणे आणि त्याच वेळी त्याला आहुती पोचल्याचे जाणवणे
‘दौर्यावर असतांना भृगु महर्षींच्या आज्ञेप्रमाणे मी प्रतिदिन अग्निहोत्र करते. १०.५.२०२१ या दिवशी आम्ही तमिळनाडू येथील तिरुवण्णमलई येथे होतो. दुपारी माझ्या मनात सहज विचार आला, ‘आज संध्याकाळी अग्निहोत्र करतांना गरुडाचे मंत्र म्हणून आहुती देऊया’; मात्र प्रत्यक्षात ज्या वेळी मी अग्निहोत्राला आरंभ केला, त्या वेळी मला सूक्ष्मातून ‘सुवर्ण रंगाचा गरुड वर घिरट्या घालत आहे’, असे दिसले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘आपण देवतांचे भावपूर्ण स्मरण केले, तरी त्या वेळी त्या उपस्थित असतातच !’
ज्या वेळी माझ्या मनात ‘गरुडदेवाला आहुती देऊया’, असा विचार आला, त्याच वेळी गरुडदेवाला सूक्ष्मातून ती आहुती पोचली होती. मला आहुती देण्याची प्रत्यक्ष कृती करावी लागली नाही आणि गरुडाने सूक्ष्म रूपातून तेथे येऊन त्याची पोचपावती दिली. पहिल्यांदाच मला अशी अनुभूती आली. यातून माझ्या लक्षात आले, ‘संतांच्या मनात केवळ एखादा विचार जरी आला, तरी तो संकल्प बनून सिद्ध होतो. त्यांना प्रत्यक्ष कृती करावी लागत नाही.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, तिरुवण्णमलई, तमिळनाडू. (१०.५.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |