श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अनुभवलेली प्रीती आणि साधनेच्या प्रयत्नांविषयी त्यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. उपजतच असलेला प्रेमभाव

‘श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यात उपजतच प्रेमभाव आहे. त्या महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना वसतिगृहात रहायला होत्या. तेव्हा त्यांच्या खोलीतील मैत्रिणींना काही त्रास होत असल्यास रात्री कितीही उशीर झाला, तरी त्या मैत्रिणींचे पाय चेपायच्या किंवा त्यांना बरे वाटेपर्यंत आवश्यक त्या कृती करायच्या. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळकाकूंचे लग्न झाल्यावर त्या मुंबई येथे रहात होत्या. तेव्हाही त्यांचे इमारतीतील सर्व गृहिणींशी जिव्हाळ्याचे संबंध होते.

२. साधकांवरील प्रीती

‘इतरांविषयी प्रेमभाव कसा असायला हवा ?’, हे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी कृतीतून शिकवले.

अ. श्रीचित्‌शक्‍ति गाडगीळकाकू दैवी दौर्‍याहून रामनाथी आश्रमात आल्यावर थकलेल्या असूनही स्वागतकक्षापासून ते त्यांच्या खोलीत जाईपर्यंत वाटेत भेटणार्‍या सर्व साधकांची प्रेमाने विचारपूस करतात.

आ. एक साधिका श्रीचित्‌शक्‍ति काकूंना अनेक दिवसांनी भेटल्यावर म्हणाली, ‘‘आम्ही तुम्हाला लांबूनच बघितले आणि आम्हाला फार आनंद झाला.’’ तेव्हा श्रीचित्‌शक्‍ति काकू म्हणाल्या, ‘‘आश्रमात आल्यावर साधकांच्या डोळ्यांतून व्यक्त होणारे प्रेम मी अनुभवते.’’ साधकांविषयी बोलतांना त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते, इतकी त्यांची साधकांवर प्रीती आहे.

इ. श्रीचित्‌शक्‍ति काकूंच्या दैवी दौर्‍यातील एखादा साधक पहाटे उठून बाहेरगावी जाणार असल्यास त्या त्यांना सकाळी उठून चहा आणि अल्पाहार बनवून देतात. त्या साधकांना निरोप द्यायला येतात आणि साधकांची चारचाकी दृष्टीआड होईपर्यंत थांबतात.

ई. एकदा एका साधकाची वहिनी गावी जाणार होती. तेव्हा त्या साधकाने त्याच्या वहिनीला ‘तुमची ‘बॅग’ जड आहे का ? मी ‘बॅग’ घेऊन खाली गाडीपर्यंत येऊ का ?’, असे विचारले. हे श्रीचित्‌शक्‍ति काकूंना कळल्यावर त्यांनी त्या साधकाला सांगितले, ‘‘केवळ विचारण्यापेक्षा ‘बॅग’ घेऊनच जायला हवे होते. हाच खरा प्रेमभाव आहे.’’

२ उ. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी दैवी दौर्‍याच्या कालावधीत त्यांच्या समवेत असणार्‍या साधकांची व्यष्टी साधना करवून घेणे : श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ दैवी दौरा करत असतांना त्यांच्या समवेत असणार्‍या साधकांची व्यष्टी साधना होण्यासाठी सतत प्रयत्नरत असतात. त्या म्हणतात, ‘‘त्या साधकांच्या साधनेचे दायित्व माझे आहे, तर मलाही तसे प्रयत्न करायला हवेत.’’ त्यांच्या समवेत असणार्‍या साधकांची प्रतिदिन स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत १० स्वयंसूचना सत्रे व्हावीत; म्हणून श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) काकू त्यांच्या समवेत स्वयंसूचना सत्रे करायला बसतात. ‘प्रत्येक साधकाचे दिवसभरातील प्रत्येक कृती करतांना देवाशी किती अनुसंधान होते ?’, याचा त्या आढावा घेतात, उदा. ‘दात घासतांना किती टक्के अनुसंधान होते ? अल्पाहार करतांना किती अनुसंधान होते ? अनुसंधान ५० टक्क्यांपेक्षा न्यून असल्यास मनात कोणते विचार होते ?’, अशा पद्धतीने त्या त्यांच्या समवेत असलेल्या साधकांचा आढावा घेतात.

३. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन

३ अ. ईश्वराचे मन जिंकण्यासाठी संपर्कात येणार्‍या व्यक्तीचे मन जिंकणे आवश्यक आहे ! : एकदा आम्ही श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) काकूंच्या सेवेत असतांना त्या म्हणाल्या, ‘‘माझ्या समोर असलेल्या व्यक्तीसाठी माझे जीवन आहे. आपण प्रेमभावाने समोरच्या व्यक्तीचे मन जिंकू शकलो नाही, तर ईश्वराचे मन कसे जिंकणार ?’’

३ आ. प्रत्येक व्यक्तीत गुरुरूप पहायला हवे ! : श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) काकू सांगतात, ‘‘आपल्या समवेत जी व्यक्ती आहे, तिच्यामध्ये गुरुरूप पहायचे. ‘ती व्यक्ती माझा गुरु आहे’, असा भाव मनात ठेवून सतत शिकण्याच्या स्थितीत रहायला हवे.’’ श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) काकू स्वतः गुरुपदावर असूनही त्या सांगतात, ‘‘केवळ माझ्याकडेच गुरु म्हणून बघू नका. ‘तुमच्या समवेत असणारा प्रत्येक जण तुमचा गुरु आहे’, असा भाव ठेवा.’’ तेव्हा वाटले, ‘असे शिष्यांना घडवणारे गुरु जगाच्या पाठीवर क्वचित्च पहायला मिळतील.’

३ इ. साधनेचा प्रवास मोक्षापर्यंतचा असल्याने आध्यात्मिक पातळीचे ६० टक्के, ७० टक्के असे टप्पे गाठल्यावरही साधकाने साधनेचे प्रयत्न सतत करत रहाणे आवश्यक आहे ! : श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) काकू कलियुगाच्या परिणामाविषयी सांगतात, ‘‘काळ इतका वाईट आहे की, आपल्याला कधी साधनेपासून लांब नेईल ?’, हे कळणारही नाही. कलियुगात ‘माझी प्रगती व्हावी’, या विचारापेक्षा आपण गुरुचरणांशी टिकून रहाणे आवश्यक आहे. आध्यात्मिक प्रगतीची टक्केवारी ही प्रवासादरम्यान येणार्‍या रेल्वेस्थानकासारखी असते. आपला प्रवास मोक्षापर्यंतचा आहे. तेव्हा मधे ६० टक्के, ७० टक्के ही स्थानके आल्यावर आपण तिथेच थांबून चालणार नाही.’’ श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) काकू स्वतःविषयी सांगतांना म्हणाल्या, ‘‘दिवसातील काही वेळच असा असतो की, तेव्हा त्या सद्गुरु म्हणून सेवा करतात. नंतर त्या ते विसरून अन्य साधकांप्रमाणे सेवा करतात.’’

४. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या मर्दन सेवेत असणार्‍या साधिकांना झालेले विविध त्रास

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळकाकू नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी आश्रमात आल्यावर आम्ही त्यांच्या मर्दनाची सेवा करत होतो. तेव्हा त्यांच्या मर्दन सेवेत असणार्‍या आम्हा साधिकांना विविध त्रास होऊ लागले, उदा. उष्णतेचे त्रास होणे, थकवा येणे, धाप लागणे, अशा प्रकारचे विविध त्रास आम्हाला होऊ लागले. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) काकू पुन्हा दैवी दौर्‍यावर जाण्यासाठी निघाल्या, तेव्हा सर्वांचे त्रास काही प्रमाणात न्यून झाले. तेव्हा आम्हाला जाणवले, ‘नवरात्रीच्या कालावधीत देवीचे, तसेच श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) काकूंच्या रूपात असलेल्या देवीचेही सूक्ष्मातून युद्ध चालू असल्याने श्रीचित्‌शक्‍ति काकूंनाही आध्यात्मिक त्रास होत होते. आम्ही श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) काकूंवर मर्दनाचे उपचार केल्यावर त्यांना बरे वाटेल; म्हणून त्यांच्या सेवेतील साधिकांनाही अनिष्ट शक्ती वरीलप्रमाणे त्रास देऊन त्यांची कार्यक्षमता न्यून करण्याचा प्रयत्न करत होत्या.’

(‘श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यावर अनिष्ट शक्तींची आक्रमणे सतत होत असतात. अशा वेळी त्यांची सेवा भावपूर्ण केल्यास सेवा करणार्‍यांना त्रास न होता आनंदच मिळणार किंवा त्यांना होत असणारे त्रासही न्यून होणार.’ – संकलक)

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मर्दन सेवेत असणार्‍या साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१०.२०२१)