संस्कृत भाषा : मानवतेला मिळालेली अनमोल देणगी !
काँग्रेसवाले आणि साम्यवादी नेते देववाणी संस्कृतचे महत्त्व समजून घेतील का ?
कर्नाटकात उभारण्यात येणार्या संस्कृत विश्वविद्यालयाला काँग्रेसवाल्यांनी नुकतेच ‘बेकार’ असे म्हटले आहे. पंडित नेहरू यांनी संस्कृत भाषेला ‘मृत’ ठरवले होते. प्रत्यक्षात देववाणी असणार्या संस्कृत भाषेचे भारतीय जीवनातील महत्त्व आणि तिच्या अभ्यासाचे महत्त्व याविषयीचा लेख येथे देत आहोत.
१. संस्कृत भाषेच्या अभ्यासाचे महत्त्व
संस्कृत भाषेला भारतीय जीवनात एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगामध्ये सहस्रो भाषा आहेत. भारताचे २५ प्रांत असून प्रत्येक प्रांताची एक भाषा आहे. सर्वच भाषा आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत. अनेक भाषा कालाच्या प्रवाहात निर्माण होतात आणि पुढे लोप पावतात. अस्तित्वात असलेल्या भाषांच्या शैली आणि उच्चार यांमध्ये सतत भेद होत असतो. मराठी भाषेचा इतिहास पाहिल्यानंतर या गोष्टी सहजतेने स्पष्ट होतात. बारा-तेराव्या शतकांतील मराठी आज विसाव्या शतकात अनाकलनीय आहे. आज उत्तर आणि दक्षिण भारतातील अनेक भाषांचीही हीच परिस्थिती आहे. संस्कृत भाषेचे महत्त्व समजण्याकरता ‘असे का घडते ?’, याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.
२. भाषा पुढील पिढ्यांपर्यंत समर्थपणे पोचवण्यासाठी तिला प्रमाणबद्ध करणे अनिवार्य असणे
भाषा हे माणसाला संपर्कासाठी उपलब्ध असलेले एक महत्त्वाचे साधन आहे. मनुष्य आपले विचार या माध्यमातून व्यक्त करतो. हे विचार जसे बोलून व्यक्त करतो, तसेच चिन्हांचा वापर करून लिखित स्वरूपातही व्यक्त करू लागतो. यातून त्याची प्रत्यक्ष बोली भाषा आणि त्यातून त्या भाषेची लिपी सिद्ध होते. बोली भाषा आणि लिपी यांमध्ये वारंवार स्थित्यंतरे होत गेली, तर ती भाषा किंवा लिपी मूळ अर्थ आणि आशय पुढील पिढ्यांपर्यंत समर्थपणे पोचवू शकत नाही; म्हणूनच भाषा आणि लिपी यांमध्ये, तसेच ती व्यक्त करण्याची पद्धत, उच्चार आणि लिखाण यांत शिस्त अन् नियंत्रण आणून त्याची पद्धत ठरवावी लागते. यातूनच पुढे भाषेचे व्याकरण सिद्ध होते.
३. प्रमाणबद्ध भाषेचे महत्त्व
भाषा अधिकाधिक व्यापक आणि अनुभव व्यक्त करण्यास समर्थ होणे आणि ती बराच काळ टिकून रहाणे यांसाठी तिला प्रमाणबद्ध करणे अनिवार्य असते. मनुष्याची संस्कृती जशी विकसित होत जाते, तसतसे त्याचे भौतिक व्यवहार वाढू लागतात. त्याच्यातील कला आणि तत्त्वज्ञान यांचा विकास होतो. त्यातून साहित्य आणि वाङ्मय निर्माण होते. मनुष्य सृजनशील प्राणी आहे. सूर्याेदयाचा अनुभव १० जणांना व्यक्त करण्यास सांगितला, तर या दहाही व्यक्ती वय, लिंग, भौगोलिक परिस्थिती यांसारख्या अनेक गोष्टींवर अवलंबून सूर्याेदयाचे तेच वर्णन वेगवेगळे शब्द वापरून किंवा वाक्यरचनेत पालट करून व्यक्त करतील. हा अनुभव व्यक्त करण्याकरता भाषा प्रमाणबद्ध असल्यास त्यांनी व्यक्त केलेले विचार सर्वांना कळू शकतील.
४. संस्कृतसारखी समृद्ध भाषा जगातच मिळणे कठीण
कित्येक वेळा एकच शब्द संस्कृतीच्या विविध छटा व्यक्त करतात. सभ्यतेच्या सांस्कृतिक श्रीमंतीचेच ते एक लक्षण आहे. नुसत्या स्त्रीला मादी, बाई, आई, बहीण, पत्नी, वामा, वारांगना, नारी इत्यादी शब्द उपलब्ध आहेत. हा प्रत्येक शब्द ही एक सांस्कृतिक छटा आहे. स्त्री जीवनाचा तो एक अनुभव आहे. सामाजिक स्थानाचे ते एक प्रतिबिंब आहे. जेव्हा भाषांमधे अनुभव व्यक्त करणारे आणि सांस्कृतिक छटा दर्शवणारे अनेक शब्द सिद्ध होतात, तेव्हा ते त्या भाषेची समृद्धी दाखवतात. या पात्रतेवर संस्कृत भाषेसारखी समृद्ध भाषा जगातच मिळणे कठीण आहे. पाणिनीने ज्या भाषेवर संस्कार केले, त्या भाषेला ‘संस्कृत भाषा’ म्हणतात. अडीच सहस्रांहून अधिक वर्षें भारतातील वैज्ञानिक, आध्यात्मिक आणि वाङ्मयीन साहित्य या भाषेतून निर्माण झाले. यामुळेच काश्मीर येथील पंडित केरळमधील पंडितांशी मातृभाषा वेगळी असूनही सहजपणे संवाद साधत होते.
५. संस्कृत भाषेत अनेक शास्त्रांचे सहस्रो ग्रंथ उपलब्ध असल्याने भारतियांनी ती जिवंत ठेवणे आवश्यक
तत्त्वज्ञान, अध्यात्म, अर्थशास्त्र, स्थापत्य, पदार्थ विज्ञान, रसायन, वैद्यक इत्यादी अनेक शास्त्रांचे सहस्रो ग्रंथ आज भारतामधील अनेक ग्रंथालयांत संस्कृत भाषेतून उपलब्ध आहेत. यामुळेही संस्कृत भाषा भारतियांनी जिवंत ठेवणे आवश्यक झाले आहे. भारतियांचा गेल्या २-३ सहस्र वर्षांचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासच या ग्रंथांमधून साठवला आहे.
६. संस्कृतचे भारतीय जीवनातील महत्त्व समजल्यावर पाश्चिमात्यांनी तिचा अभ्यास हिरीरीने करणे
सतराव्या अठराव्या शतकांमध्ये व्यापार आणि धर्माचा प्रसार यांकरता पाश्चिमात्य भारतात येऊ लागले. तेव्हा त्यांना संस्कृत भाषेचे भारतीय जीवनातील महत्त्व समजले आणि त्यांनी संस्कृत भाषेचा अभ्यास हिरीरीने चालू केला. नुसत्या प्रांतिक भाषेच्या अभ्यासावर ते थांबले नाहीत. प्रारंभीच्या संस्कृत अभ्यासकांमध्ये बहुसंख्य ख्रिस्ती धर्मप्रचारक आहेत. रॉथ या धर्मप्रसारकाने सतराव्या शतकातच पाणिनीच्या व्याकरणाचे ‘लॅटिन’मध्ये भाषांतर केले आहे. अरबांनी ९ ते ११ व्या शतकांमध्ये अनेक भारतीय शास्त्रविषयक ग्रंथाचे ‘अरेबिक’ भाषेत भाषांतर करून ठेवले आहे. (‘जे बाहेरील देशातील लोकांना कळते, ते भारतियांना कळत नाही; हे भारतियांचे दुर्दैव !’ – संपादक)
७. काही सिद्धांतवादी आणि राजकारणी यांनी संस्कृतचा संबंध जातीयवादाशी जोडणे अन् याचा संस्कृतच्या प्रसारावर विपरित परिणाम होणे
दुर्दैंवाने काही सिद्धांतवादी आणि राजकारणी यांनी संस्कृतचा संबंध जातीयवादाशी जोडला. असल्या आत्मघातकी आणि अदूरदर्शी धोरणांमुळे संस्कृतचे अध्ययन आणि प्रसार यांवर विपरित परिणाम झाला. त्याचे दूरगामी अनिष्ट परिणाम राष्ट्राला भोगावे लागतील. भाषेच्या गुलामीइतकी वाईट गुलामी कोणतीच नाही. अनेक तर्कवाद आणि युक्तीवाद यांच्या माध्यमातून भाषातज्ञच समाजाचा बुद्धीभेद करत असतात. अशा विद्वानांच्या अनेक पिढ्या गेल्या तरी अखिल मानवजातीला आकलन होईल, अशी प्रमाणबद्ध भाषा ते निर्माण करू शकणार नाहीत.
८. भारतीय भाषा संस्कृतोद्भव झाल्यास सांस्कृतिकदृष्ट्या विघटनाकडे चाललेला भारत पुन्हा एकसंघ होऊ शकणे
संस्कृत भाषेची निर्मिती ही भारताची मानवतेला दिलेली मोठी देणगी आहे. या भाषेमध्ये न संपणारे ज्ञानाचे भांडार आहे. अनेक वैज्ञानिक विचार आणि जीवनातील विविध अनुभव यांना न्याय देईल, असे शब्दभांडार आहे. सर्व भारतीय भाषांनी त्यामध्ये येथेच्छ डुंबून त्याचा आस्वाद घ्यावा, तरीही तो न आटणारा एक स्रोत आहे. भारतीय भाषा जेवढ्या अधिकाधिक संस्कृतोद्भव होतील, तेवढ्या त्या अधिकाधिक इतर प्रांतिक भाषिकांना आकलनीय होतील. अनुभव व्यक्त करण्याची त्यांची क्षमता वाढेल आणि याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या विघटनाकडे चाललेला हा भारत पुन्हा एकसंघ होईल.’
(यासाठीच मूळच्या संस्कृतोद्भव असलेल्या मराठी भाषेत आलेले परकीय शब्द काढून टाकून ती सात्त्विक करण्याचे कार्य सनातन संस्था ‘भाषाशुद्धीची चळवळ’ राबवून करत आहे. – संकलक)
(साभार : संपादकीय : डॉ. विजय वासुदेव बेडेकर, ‘सद्धर्म’ त्रैमासिक, (संस्थापक गुंडोपंत हरिभक्त), एप्रिल १९९९, चैत्र १९२१)
परिपूर्णतेमुळे चैतन्यात अग्रेसर असलेली देववाणी संस्कृत‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि संबंधित शक्ती एकत्र असतात’, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. संस्कृत भाषेत उच्चाराप्रमाणे लिखाण आणि लिखाणाप्रमाणे उच्चार असल्याने उच्चार अन् लिखाण यांची स्पंदने एकमेकांशी जुळणारी असतात; म्हणूनच संस्कृत ही परिपूर्ण भाषा आहे. परिपूर्णता हा ईश्वराचा गुण आहे. सर्व भाषांच्या तुलनेत संस्कृत भाषेत सर्वाधिक चैतन्य आहे. या उलट मराठी भाषेत काही ठळक त्रुटी आढळतात. अशा त्रुटींमुळे भाषेतील चैतन्यही घटते. म्हणून मराठी भाषेत संस्कृतच्या तुलनेत अल्प चैतन्य आहे. पुढील उदाहरणांतून संस्कृतचे श्रेष्ठत्व आणि मराठीतील त्रुटी लक्षात येतील. १. लिखाणाप्रमाणे उच्चार‘संस्कृत भाषेत ‘अनुस्वार पदाच्या मध्ये आल्यास त्या ठिकाणी पर-सवर्ण, म्हणजे पुढील वर्णाच्या, म्हणजे अक्षराच्या वर्गातील शेवटचे अक्षर लिहावे’, असा नियम आहे, उदा. शां + त = शान्त, ग्रं + थ = ग्रन्थ. असे लिहिल्यामुळे अनुस्वाराचा उच्चार कसा करावा, हे कोणालाही सहज लक्षात येते. ‘शांत’, ‘ग्रंथ’ असे लिहिणे संस्कृतदृष्ट्या चुकीचे आहे. मराठी भाषेत अनुस्वाराऐवजी पर-सवर्ण न लिहिता बहुधा अनुस्वारच लिहिला जातो. यामुळे ‘शब्दाचा उच्चार कसा करावा ?’ हे केवळ लिखाणावरून लक्षात येत नाही, उदा. ‘शांत’ आणि ‘ग्रंथ’ यांसारख्या शब्दांचे उच्चार कोणी अनुक्रमे ‘शाम्त’, ‘ग्रम्थ’ असेही करू शकेल. २. परिपूर्ण व्याकरणकवि, बुद्धि, गति, संस्कृति यांसारखे शब्द र्हस्वान्त (शेवटचे अक्षर र्हस्व असलेले), तर नदी, लक्ष्मी, वधू यांसारखे शब्द दीर्घान्त (शेवटचे अक्षर दीर्घ असलेले) का लिहिले जातात ? अशा प्रत्येक ‘का ?’चे उत्तर व्याकरणातील विशिष्ट सूत्र सांगून देता येते. संस्कृत भाषेत कोणताही शब्द नियमबाह्य वापरताच येत नाही. मराठीत मात्र कवी, बुद्धी, गती, संस्कृती यांसारखे मूळ ‘इ-कारान्त’ असलेले शब्द ‘ई-कारान्त’ लिहिले जातात. असे का ? याला काही उत्तर देता येत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२१.२.२०१४) |