(म्हणे) ‘सौजन्याने वागणार नसाल, तर थोबाड फोडू !’
मौलाना (इस्लामी विद्वान) तौफीर रझा यांची ‘न्यूज १८’चे सूत्रसंचालक अमन चोपडा यांना थेट प्रक्षेपण होत असलेल्या कार्यक्रमात धमकी
|
नवी देहली – ‘तुम्ही जर सौजन्याने वागणार नसाल, तर तुमचे थोबाड फोडले जाईल’, अशी धमकी ‘इत्तेहाद-ए-मिल्लत’ या संघटनेचे अध्यक्ष मौलाना (इस्लामी विद्वान) तौफीर रझा यांनी हिंदी वृत्तवाहिनी ‘न्यूज १८’चे सूत्रसंचालक अमन चोपडा यांना थेट प्रक्षेपण होत असलेल्या एका कार्यक्रमात दिली. या वृत्तवाहिनीनीने मौलाना रझा यांनी यापूर्वी केलेले आक्षेपार्ह विधान ऐकवून त्याविषयी रझा यांचे मत विचारले होते. त्या वेळी रझा यांनी ही धमकी दिली.
१. तौकीर रझा यांना त्यांची पूर्वीची आक्षेपार्ह विधाने ऐकवल्यावर ते अमन चोपडा यांना म्हणाले की, तुम्ही सौजन्याने बोलणार असाल, तर मीही सौजन्याने उत्तर देईन. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने वागणार असाल, तर तुम्हाला चपलेने मारीन.
२. तौकीर यांच्या या धमकीवर अमन चोपडा यांनी त्यांना विचारले की, तुम्ही नेमके काय करणार आहात ? मुळात तुम्ही आक्षेपार्ह विधाने केलीतच का ?
३. त्यावर रझा यांनी चोपडा यांना थोबाड फोडण्याची धमकी दिली. यावर चोपडा यांनी रझा यांना पुन्हा प्रश्न विचारला की, तुम्ही थोबाड कसे फोडणार आहात ? तुम्ही कमलेश तिवारी यांच्या प्रमाणे करणार का ? (कमलेश तिवारी हे उत्तरप्रदेशातील हिंदुत्वनिष्ठ होते. त्यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित अवमानकारक विधाने केल्याने धर्मांधांनी त्यांची हत्या केली होती.)
४. मौलाना तौफीर रझा यांनी उत्तरप्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला नुकताच पाठिंबा दिला आहे. त्यानंतर त्यांनी यापूर्वी केलेली आक्षेपार्ह विधाने प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमे यांवरून प्रसारित होऊ लागली आहे. तौकीर रझा यांनी ‘ज्या दिवशी मुसलमान कायदा हातात घेईल, तेव्हा हिंदूंना संपूर्ण देशात आश्रय घेण्यासाठी जागा मिळणार नाही’ असे विधान केले होते.