देहलीतील फिरोज शाह कोटला गडामध्ये अवैधरित्या घुसून आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान आणि सहकार्यांकडून नमाजपठण !
‘हिंदु आर्मी’ संघटनेकडून नमाजपठणाच्या विरोधात हनुमान चालिसाचे पठण
|
नवी देहली – आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी येथील फिरोज शाह कोटला गडामध्ये घुसून नमाजपठण केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात गडामध्ये जाण्यासाठी तिकीट घ्यावे लागत असतांना अमानतुल्ला खान आणि त्यांचे १५ सहकारी यांनी सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की करत गडामध्ये घुसून नमाजपठण केल्याचे या व्हिडिओमुळे उघड झाले. यास प्रत्युत्तर म्हणून‘हिंदु आर्मी’ संघटनेचे अध्यक्ष श्री. संजीव भाटी यांनी या गडाजवळ उभे राहून एक व्हिडिओ बनवून येथे प्रत्येक मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करण्याचे हिंदूंना आवाहन केले आहे. या आवाहनानुसार मंगळवार, १८ जानेवारी या दिवशी श्री. संजीव भाटी त्यांच्या सहकार्यांसह येथे हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी आले असता पोलिसांनी येथे अडथळे (बॅरिकेड्स) ठेवून बंदोबस्त ठेवल्याचे आढळून आले. तेव्हा श्री. भाटी आणि त्यांच्या सहकार्यांनी तेथेच बसून हनुमान चालिसाचे पठण केले.
आमदार अमानतुल्ला खान यांच्याकडून हिंदुत्वनिष्ठांना धमक्या !
याविषयी श्री. संजीव भाटी म्हणाले की, हा गड पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतो. गड पहाण्यासाठी तिकीट घ्यावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासून या गडामध्ये नमाजपठण केले जाते. काही दिवसांपूर्वी काही लोकांनी नमाजपठण करण्यास येणार्यांना रोखून त्यांना तिकीट घेण्यास लावल्यानंतर आमदार अमानतुल्ला खान यांनी त्यांच्या सहकार्यांसह येथे सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की करत नमाजपठण केले होते. हा ‘भूमी जिहाद’चा (लँड जिहादचा) प्रकार आहे. याविषयी आम्ही लोकांना जागृत करत आहोत. याविषयी तक्रारही करण्यात आली आहे. आम्हाला खान यांच्याकडून धमक्या देण्यात आल्या आहेत. याविषयी आम्ही गुन्हा नोंदवणार आहोत. (देहलीमध्ये केंद्र सरकारचे, म्हणजेच भाजप सरकारचे पोलीस आहेत. याविषयी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत खान यांना कारागृहात डांबण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)