शिकण्याची वृत्ती आणि संतांप्रती भाव असलेला ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. कार्तिक अंकुश येरगेवार (वय ११ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. कार्तिक येरगेवार हा या पिढीतील एक आहे !

‘वर्ष २०१७ मध्ये ‘कु. कार्तिक अंकुश येरगेवार  महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आला असून तो ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२१ मध्ये त्याची पातळी ६२ टक्के झाली आहे. आता त्याच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे त्याची साधनेत प्रगती होत आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

कु. कार्तिक येरगेवार

 

‘हिंगोली (महाराष्ट्र) येथील कु. कार्तिक अंकुश येरगेवार याच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. शिकण्याची वृत्ती

अ. ‘कार्तिक मला ‘ऑनलाईन’ सत्संगासाठी संगणकाच्या संदर्भातील सर्व साहाय्य करतो. ‘सत्संगाची ‘पी.डी.एफ्’ करणे, ती संगणकात ठेवणे आणि ‘डाऊनलोड’ करून घरीच ‘प्रिंट’ काढणे’, या सर्व कृती त्याने शिकून घेतल्या आहेत. त्यामुळे मला त्याचे पुष्कळ साहाय्य होते.

आ. त्याने संगणकावर मराठी टंकलेखन करणे शिकून घेतले आहे. गुरुकृपेने आम्हाला वर्ष २०१९ मध्ये रामनाथी आश्रमात जाण्याची संधी मिळाली. आम्ही २ दिवस आश्रमात होतो. तेव्हा कार्तिकला ‘किती शिकू आणि किती नको !’, असे झाले होते.

इ. आमच्या येथील पंख्याची गती अल्प-अधिक करण्याची कळ (बटन) तुटली. तेव्हा त्याने दुसरे ‘प्लॅस्टिक’च्या झाकणाचे बटन बनवले.

सौ. तृप्ती येरगेवार

२. कलेची आवड

आम्ही प्रत्येक वर्षी घरी शाडूच्या मातीचा गणपति बसवतो. या वर्षी त्याने एक दिवसात श्री गणेशाची सुंदर मूर्ती बनवली.

३. प्रत्येक कृती परिपूर्ण करणे 

अ. ‘पूर्वी कार्तिकला ‘प्रत्येक गोष्ट कशी करायची ?’, ते सांगावे लागत असे; परंतु आता ‘प्रत्येक कृती करतांना ती गुरुदेवांना आवडेल आणि त्यातून साधना कशी होईल ?’, याकडे त्याचे लक्ष असते. एकदा त्याच्या बाबांनी जेवतांना कांदा मागितला. तेव्हा त्याने कांद्यावरील साल काढून त्यांना कांदा दिला.

आ. एकदा त्याने त्याच्या आत्याला उशी देतांना उशीच्या खोळीला तेलाचे डाग पडू नयेत, यासाठी त्यावर कापड ठेवून उशी दिली.

४. देवाला विचारून योग्य कृती करणे 

श्री. अंकुश येरगेवार

अ. एकदा मी त्याला म्हणाले, ‘‘खेळायला जातांना देवाला सांगून जात जा.’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘देवाला सर्व ठाऊक आहे. मी देवाला मनातील सर्व सांगतो.’’

आ. आम्ही गव्हाची २ पोती आणली होती. त्यातील ‘कोणते पोते ठेवून घ्यायचे ?’, हे त्याला विचारले. तेव्हा त्याने सांगितलेले पोते चांगले निघाले; पण दुसर्‍या पोत्यात पुष्कळ पोरकिडे असल्याचे दिसले.

५. संतांप्रती भाव असणे

पू. अशोक पात्रीकरकाका हिंगोलीला येणार होते. तेव्हा कार्तिकने मला घर आवरायला साहाय्य केले. त्या वेळी तो आणि त्याचे बाबा यांचा उत्साह पाहून मलाही आनंद वाटू लागला. मला घरी चैतन्य अनुभवता येऊन माझा भाव जागृत झाला.’

– सौ. तृप्ती अंकुश येरगेवार (कार्तिकची आई)

६. कार्तिकचे स्वभावदोष

६ अ. आळस : कार्तिकच्या हातात उपायांचे साहित्य (कापूर, अत्तर) दिले, तरच तो उपाय करतो. तो अभ्यासाचा आळस करतो.

६ आ. एकलकोंडेपणा

६ इ. राग येणे’

– श्री. अंकुश येरगेवार (कार्तिकचे वडील) (१४.११.२०२१)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता