‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियाना’च्या अंतर्गत कोल्हापूर महापालिकेस २३७ कोटी ४७ लाख रुपयांच्या निधीस संमती ! – राजेश क्षीरसागार, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ
कोल्हापूर, १८ जानेवारी (वार्ता.) – ‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियाना’च्या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेस रस्ते, गटार, भुयारी मार्ग, पदपथ करण्याच्या कामासाठी राज्यशासनाने २३७ कोटी ४७ लाख रुपयांच्या निधीस तांत्रिक संमती दिली आहे. या निधीतून कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख ८२ रस्त्यांचे सक्षमीकरण आणि डांबरीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. क्षीरसागर पुढे म्हणाले, ‘‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियाना’च्या अंतर्गत वर्ष २०१७ मध्ये कोल्हापूर महापालिकेने १८९ कोटी ५५ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनास सादर केला होता; परंतु हा प्रस्ताव गेली ५ वर्षे प्रलंबित होता. यातील काही त्रुटी दुरुस्त करून आणि सुधारणा करून हा प्रस्ताव परत एकदा शासनाकडे सादर करण्यात आला. याविषयी नगरविकासमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. यामुळे २३७ कोटी ४७ लाख रुपयांच्या निधीस संमती मिळाली. या निधीतून शहरातील प्रमुख २० किलोमीटरचे रस्ते, १५ उपरस्ते त्यांना जोडणारे ३० किलोमीटरचे रस्ते यांसह अन्य कामे करण्यात येणार आहेत.’’