नागपूर येथे विद्यापीठ विधेयकाच्या विरोधात भाजपचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या घरासमोर निषेध आंदोलन !
नागपूर – महाविकास आघाडी सरकार विद्यापीठ विधेयक विधानसभेत संमत करून शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात राजकारण आणण्याचे काम करत आहे, असा आरोप करून भाजप युवा मोर्चाच्या युवती आघाडीच्या वतीने रवी भवन येथील पालकमंत्री नितीन राऊत यांच्या शासकीय निवासस्थानसमोर १६ जानेवारीच्या रात्री रांगोळी काढून आणि ‘काळे विधेयक मागे घ्या’, असे फलक लावून जाहीर निषेध नोंदवला आहे.
विद्यापीठ विधेयक विधानसभेत चर्चा न करता पारित करण्यात आले आहे. हे विधेयक विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी धोक्याचे आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात राजकारण करण्याचे पाप महाविकास आघाडी सरकार करत आहे. हे सरकार स्वतःच्या स्वार्थासाठी विधेयक संमत करत आहे. विद्यापिठाच्या भूमी लाटण्याचा हा सगळा घाट आहे. विद्यापिठात विधेयक मान्य करून राजकारण करू नये. हे काळे विधेयक परत घ्या. या सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी आम्ही रात्रीच्या सुमारास आंदोलन करत आहोत, असे भाजप युवा मोर्चाच्या युवतीप्रमुख शिवानी दाणी यांनी सांगितले.