भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी घृणास्पद वक्तव्य केल्याचे प्रकरण
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणार्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने १८ जानेवारी या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपने या वक्तव्याचा निषेध करत राज्यात विविध ठिकाणच्या पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्या आहेत. यामध्ये पटोले यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सर्वच राजकीय पक्षांकडून पटोले यांच्या विधानाची निंदा केली जात आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी ट्वीट केले आहे. ‘काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय ? हा पक्ष इतक्या रसातळाला गेला आहे. काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे की दहशत पसरवणारी संघटना’, असा प्रश्न फडणवीस यांनी केला आहे.
पटोले यांच्या वक्तव्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. भंडारा गोंदियाचे भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनीही नाना पटोले यांच्या विरोधात भंडारा शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.