शालेय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके यांमध्ये आमूलाग्र पालट आवश्यक !
देशाची भावी पिढी घडवण्याच्या दृष्टीने ‘शिक्षण’ हे प्रभावी माध्यम आहे. शाळांतून शिकून बाहेर पडलेली पिढी देशाचे नेतृत्व सांभाळते. त्यामुळे शाळांमध्ये मुलांना योग्य शिक्षण मिळण्यासह त्यांच्यावर चांगले संस्कार होणे महत्त्वाचे ठरते; परंतु आजच्या शिक्षणपद्धतीत तसे घडतांना दिसत नाही. त्याची उदाहरणे पाहूया.
१. प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर ‘गोव्यापेक्षा पोर्तुगाल चांगला’ असे बिंबवण्याचा प्रयत्न
गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या १० वीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत शिक्षकाने एका प्रश्नामध्ये पोर्तुगालचे समर्थन करणारा संवाद छापला होता. ‘गोव्यापेक्षा पोर्तुगाल चांगला’, असेच या प्रश्नामधून अभिप्रेत होत होते. शालेय मुलांच्या संवेदनशील मनांवर या संवादाचा काय परिणाम होईल ? याचा विचार प्रश्नपत्रिका काढणार्या शिक्षकाने केलेला दिसत नाही. आपला प्रदेश किंवा आपले राष्ट्र यांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात द्वेषभावना तर निर्माण होणार नाही ना ? याचाही विचार झालेला दिसत नाही. अशा विचारसरणीचे शिक्षक विद्यादानाचे कार्य करत असतील, तर भावी पिढी कशी घडेल ?
२. एन्.सी.ई.आर्.टी.चा हिंदुद्वेष आणि ब्रिटीशधार्जिणेपणा
अ. एन्.सी.ई.आर्.टी.च्या इयत्ता ७ वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये परकीय आक्रमकांच्या भारतातील राजवटीचा उदोउदो केल्याचे, तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अगदी गौण महत्त्व दिल्याचे पुढे आले होते. मोगलांचा इतिहास पानेच्या पाने भरून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास केवळ चारच ओळींत मांडणार्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून भारताच्या उज्ज्वल भवितव्याची अपेक्षा करणेच चुकीचे ठरील. या सूत्रावरून गोव्यात आंदोलनही छेडण्यात आले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचे लिखाण पाठ्यपुस्तकामध्ये वाढवण्यात आले.
आ. एन्.सी.ई.आर्.टी.च्या इयत्ता १० वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात दुसर्या महायुद्धाच्या काळातील ब्रिटीश आणि युरोपातील इतर राज्यकर्त्यांची आक्षेपार्ह छायाचित्रे अन् अनावश्यक संदर्भ छापले होते. गोव्यातील जागृत पालकांनी आंदोलन छेडल्यावर पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमातून हटवले गेले.
३. अभ्यासक्रमातून मुलांवर राष्ट्रद्रोह आणि धर्मद्रोह यांचे कुसंस्कार
इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये भारतातील समकालीन सामाजिक स्थितीविषयीचा इतिहास शिकवला जातो. या प्रकरणांचा अभ्यास केला असता, समाजातील विविध जाती-धर्मांमध्ये द्वेषभावना निर्माण करणारी विधाने आढळतात. विविध भाषांच्या विषयांमध्येही अशी भेदभावयुक्त विधाने जाणीवपूर्वक घुसडलेली असतात. अशा अभ्यासक्रमातून मुलांच्या कोवळ्या मनांवर राष्ट्रद्रोह आणि धर्मद्रोह यांचे कुसंस्कार होतात. ‘विविधतेत एकता’ (‘युनिटी इन डायव्हर्सिटी’) ही आपली ओळख असल्याचे सांगितले जाते; परंतु प्रत्यक्षात विविधतेच्या आधारे समाजात फूट पाडण्याचे काम पद्धशीरपणे केले जाते.
४. आतापर्यंतच्या अभ्यासक्रमातून भारताचा खरा इतिहास दडपला जाणे
भारतातील मुलांवर विद्यार्थीदशेतच राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही विचार बिंबवले जातात. याला भारतातील इंग्राजळलेले इतिहासकार, साम्यवादी विचारवंत आणि आधुनिकतेचा खोटा आव आणणारे शिक्षक उत्तरदायी ठरतात. भारतात आजपर्यंत जो अभ्यासक्रम शिकवला गेला, त्यामध्ये भारताचा खरा इतिहास दडपला गेला आणि ब्रिटिशांचा, तसेच मोगलांचा उदोउदो करणारा खोटा इतिहास विद्यार्थ्यांच्या माथी मारण्यात आला.
५. वैभवशाली इतिहासातून बोध घेऊन इतिहास रचा !
भारतातील महान पराक्रमी राजांच्या वैभवशाली इतिहासाच्या शौर्यकथा वाचून त्यातून बोध घेऊन पुढील इतिहास रचणे अपेक्षित असते; परंतु शूरविरांचा इतिहास दडपला गेल्याने नवीन पिढी राष्ट्र आणि धर्म प्रेम यांपासून वंचित आहे. या चुकीच्या शैक्षणिक धोरणाला समकालीन शासनकर्ते उत्तरदायी आहेत; परंतु आज भारताच्या राजकीय पटलावर लोकांनी परिवर्तन घडवून आणले आहे, म्हणजेच देशात जे चुकीचे घडत होते, त्यात पालट करण्याचा जनादेश विद्यमान शासनकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अभ्यासक्रमाच्या दृष्टीनेही ठोस पावले उचलली जावीत, ही अपेक्षा !
– श्री. उमेश नाईक, माजी मुख्याध्यापक, मडकई, गोवा.