(म्हणे) ‘कोरोना हा सैतान असून तो अल्लाने पाठवला आहे !’ – टी.के. हामजा, नेते, माकप
|
थिरूवनंतपूरम् – कोझीकोड येथे ‘वक्फ बोर्डा’ने आयोजित केलेल्या एका बैठकीमध्ये सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकपचे) वरिष्ठ नेते टी.के. हामजा यांनी ‘कोरोना हा सैतान असून तो अल्लाने पाठवला आहे. भरकटलेल्या मनुष्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून जोपर्यंत मनुष्य योग्य मार्गाकडे वळत नाही, तोपर्यंत सैतान परत जाणार नाही’, असे वक्तव्य केले आहे. हामजा हे माकपचे माजी मंत्री होते. ते ‘वक्फ बोर्डा’चे माजी अध्यक्षही आहेत.
हामजा पुढे म्हणाले, ‘‘लोकांनी विशेषतः मुसलमानांनी ‘कुराणच्या शिकवणीपासून आपण लांब गेलो नाही ना ?’, याविषयी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. हे पूर्ण जग अल्लाचे आहे. त्याच्या मालमत्तेच्या रक्षणाचे दायित्व आपल्यावर सोपवले आहे. त्यामुळे सर्वांनी या मालमत्तेच्या रक्षणासाठीचे कार्य मनापासून करणे आवश्यक आहे.’’