पीओपींच्या मूर्तीविषयी ‘सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती’ची मुंबई महापालिकेसह बैठक पार पडली !
मुंबई – प्लास्टर ऑफ पॅरीस अर्थात् (पीओपी)च्या मूर्ती, तसेच अन्य विषय यांवर ‘बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती’, मूर्तिकार संघटना, महापौर आणि मुंबई महापालिका आयुक्त यांची बैठक पार पडली.
या बैठकीत प्लास्टर ऑफ पॅरीस मूर्तींविषयी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ज्या सूचना (गाईडलाईन्स) दिल्या आहेत, त्यावर चर्चा झाली. गणेशोत्सव समितीचे पदाधिकारी आणि मूर्तिकार यांनी प्लास्टर ऑफ पॅरीसमधील जे घटक पर्यावरणाला हानीकारक आहेत, ते बाजूला करून पीओपीची मूर्ती करता येऊ शकते का ? याविषयी ‘सेंट्रल सायंटिफिक कमिटी’कडे विचारणा करावी, अशी सूचना केली. मूर्तीला रंग देतांना नैसर्गिक रंगांचा वापर केला, तर प्रदूषण होणार नाही, याची काळजी मूर्तिकार घेतील, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने वर्ष २०२० मध्ये दिलेल्या सूचनांमध्ये काही संभ्रम असून ते संभ्रम दूर करण्यासाठी त्यांच्याशी प्रशासनाने चर्चा करावी, असे मत समन्वय समितीच्या पदाधिकार्यांनी मांडले.