लोहगडावरील धर्मांधांच्या अवैध कृतींचे अन्वेषण करण्याऐवजी पोलीस प्रशासनाकडून हिंदुत्वनिष्ठ संघटनांनाच नोटीस !
‘लोहगडावर होत असलेल्या अनधिकृत बांधकामाकडे कानाडोळा का ?’ – हिंदुत्वनिष्ठांचा संतप्त प्रश्न
|
पुणे, १७ जानेवारी (वार्ता.) – लोहगडावरील उरुसाविषयी (मुसलमान सत्पुरुषाच्या पुण्यतिथीनिमित्त होणार्या उत्सवाविषयी) समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना संतप्त झाल्या आहेत. अनेक हिंदुत्वनिष्ठांनी निवेदने आणि तक्रारी यांच्या माध्यमांतून लोहगडावर होणार्या अनधिकृत उरुसाला बंदी घालण्यात यावी, यासाठी प्रयत्न केले. आता त्याच हिंदुत्वनिष्ठ संघटनांना स्थानिक पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. ‘कोरोनामुळे लागू करण्यात आलेली जमावबंदी, तसेच प्रसारमाध्यमांमध्ये पसरलेल्या अफवा यांमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये’ हे कारण सांगत नोटिसीद्वारे हिंदुत्वनिष्ठ संघटनांना लोहगड आणि क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. ‘या सर्व प्रकरणात लोहगडावर होत असलेल्या अनधिकृत बांधकामाकडे मात्र कानाडोळा का केला जात आहे ?’, असा संतप्त प्रश्न हिंदुत्वनिष्ठ उपस्थित करत आहेत. ‘प्रतिवर्षीप्रमाणे लोहगड येथे होणारा उरूस कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांमुळे रहित करण्यात आला आहे’, असेही या नोटिसीत म्हटले आहे. (म्हणजे महामारी नसती, तर उरूस झाला असता. महामारीमुळे नव्हे, तर अनधिकृत बांधकामामुळे तो होता कामा नये, हे पोलीस आणि पुरातत्व विभाग यांच्या लक्षात येत नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरेल ! – संपादक)
लोहगडावर होणार्या अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष !
लोहगड येथे होणार्या उरुसाविषयी ‘यावर्षी कोरोनाकाळात उरूस साजरा झाला’, अशा आशयाच्या चुकीच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांनी दिल्या. हे सूत्र उचलून धरत स्थानिक पोलीस प्रशासनाने चुकीची वृत्ते प्रसिद्ध झाल्याने हिंदुत्वनिष्ठांनी तिथे जाऊ नये, यासाठी त्यांना नोटिसा पाठवल्या. ‘असे करून लोहगडावर होणार्या अनधिकृत बांधकामाच्या सूत्राला बगल दिली का ?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या नोटिसीनुसार यावर्षी उरूस रहित करण्यात आला; परंतु यापूर्वी उरूस अनधिकृतरित्या लोहगडावरच साजरा कसा झाला ? अशीही स्वाभाविक शंका सामाजिक माध्यमांतून व्यक्त केली जात आहे.