कोल्हापूर येथे ‘शिवशक्ती प्रतिष्ठान’च्या वतीने ३४१ वा छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेकदिन उत्साहात साजरा !
कोल्हापूर, १७ जानेवारी (वार्ता.) – ‘शिवशक्ती प्रतिष्ठान’च्या वतीने १६ जानेवारी या दिवशी ३४१ वा छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रतिष्ठानच्या वतीने रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील स्मारक परिसरात रांगोळी काढून संपूर्ण स्मारक परिसरात फुलांची सजावट करण्यात आली. यानंतर उपस्थित सदस्य आणि शिवशंभूप्रेमी यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करून मानाचा मुजरा करण्यात आला. उपस्थितांना साखर-पेढे यांचे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला. या वेळी ‘शिवशक्ती प्रतिष्ठान’चे अध्यक्ष श्री. साताप्पा कडव, उपाध्यक्ष श्री. योगेश रोकडे, सर्वश्री प्रशांत जाधव, प्रफुल्ल भालेकर, प्रवीण कुरणे, श्रेयस कुरणे, मनीष बडदारे यांसह अन्य शिवप्रेमी उपस्थित होते.