सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्शक्ति(सौ.) अंजली मुकुल गाडगीळ तमिळनाडू येथील ‘ईंगोईमलै’ पर्वतावर गेल्यावर आलेले दैवी अनुभव !
औषधशास्त्राचे जाणकार सिद्ध ‘भोगर ॠषि’ यांच्या स्थानाचे दर्शन !
१. पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना ईंगोईमलै पर्वतावर जाण्यास सांगणे
‘१२.३.२०२० या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा तमिळनाडूतील ईरोड येथे मुक्काम होता. त्या दिवशी सकाळी पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांचा भ्रमणभाष आला आणि त्यांनी सांगितले, ‘‘१२.३.२०२० या दिवशी संध्याकाळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या ईंगोईमलै पर्वतावर जाऊन यावे. या पर्वतावरील शिव मंदिरात अगस्ती ॠषि मधमाशीच्या रूपात शिव दर्शनाला गेले होते. या पर्वतावर औषधशास्त्राचे जाणकार सिद्ध ‘भोगर ॠषि’ यांचे तपश्चर्या करण्याचे स्थान आहे; म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी आणि साधकांसाठीच्या औषधांसाठी तिथे जाऊन प्रार्थना करावी.’’
२. ईंगोईमलै पर्वतावर पाचूचे शिवलिंग बघतांना ‘इंद्र शापमुक्त कसा होतो ?’, याची कथा समजणे
या पर्वतावर ‘श्रीमरगदाचलेश्वर’ या नावाचे शिवाचे मंदिर आहे आणि ‘श्रीमरगदंबिका’ या नावाचे पार्वतीदेवीचे मंदिर आहे. तमिळ भाषेत ‘मरगद’ म्हणजे पाचू. येथील शिवलिंग पाचूचे आहे. इंद्राला शाप मिळाल्यामुळे तो माकड योनीत जन्माला येतो. इंद्र माकड योनीत असतांना वृक्षावर असलेल्या मधमाश्यांच्या पोळ्याला त्याचा धक्का लागतो आणि ते पोळे विस्कटते. तेव्हा त्यातील मध पाचूच्या शिवलिंगावर पडून मधाचा अभिषेक होतो. त्यामुळे इंद्र शापमुक्त होतो आणि मनुष्य योनीत राजाच्या रूपात जन्म घेतो. तेव्हा तो पाचूच्या शिवलिंगाचे मंदिर बांधतो.
३. ‘मधमाशीच्या रूपात येऊन दर्शन घ्या’, अशी अशरीरवाणी होणे; म्हणून अगस्ती महर्षींनी मधमाशीचे रूप धारण करून शिवलिंगाचे दर्शन घेणे
या पर्वतावरील पाचूच्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी अगस्ती महर्षि येतात. तेव्हा मंदिराचे दार बंद असते. त्या वेळी ‘मधमाशीच्या रूपात येऊन दर्शन घ्या’, अशी अशरीरवाणी त्यांना ऐकू येते. तेव्हा अगस्ती महर्षि मधमाशीचे रूप धारण करतात आणि उडत उडत मंदिराच्या आत जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेतात. तमिळ भाषेत मधमाशीला ‘तेन्-ई’, असे म्हणतात. त्यातील ‘तेन्’ म्हणजे मध आणि ‘ई’ म्हणजे माशी; म्हणून या पर्वताला ईंगोईमलै, म्हणजे ‘माश्यांचा पर्वत’, असे नाव पडले.
४. सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ ईंगोईमलै पर्वतावर जाणे आणि औषधशास्त्राचे जाणकार ‘भोगर ॠषि’ यांच्या स्थानाचे दर्शन घेणे
१२.३.२०२० या दिवशी संध्याकाळी सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ ईंगोईमलै पर्वतावर गेल्या. त्यांनी पर्वताच्या पायथ्याशी औषधशास्त्राचे जाणकार सिद्ध ‘भोगर ॠषि’ यांच्या स्थानाचे दर्शन घेतले. नंतर त्यांना ५५० पायर्या चढून पर्वतावर जायचे होते. तेव्हा त्या स्थानिक लोकांच्या साहाय्याने डोलीने पर्वतावर गेल्या.
५. पर्वतावर जातांना लक्षात आलेली सूत्रे
अ. ईंगोईमलै पर्वतावर जातांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चारचाकी वाहनासमोर एक भारद्वाज पक्षी आला. तो वाहनाच्या समोरून हळूवार चालत जात होता.
आ. मंदिरात नेण्यासाठी आम्ही डोलीवाल्यांशी बोलत होतो. तोपर्यंत सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ गाडीत बसून एकटक डोंगरावरील मंदिराकडे बघत होत्या. तेव्हा त्यांना एक सुंदर गरुड पक्षी मंदिराभोवती घिरट्या घालतांना दिसला आणि ‘तो प्रदक्षिणा घालत आहे’, असे वाटले.
६. मंदिरात गेल्यावर लक्षात आलेली सूत्रे
अ. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मंदिरात गेल्या आणि त्यांना देवीच्या मंदिराच्या मागे एक घुबड बसलेले दिसले. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ त्या घुबडाच्या जवळ गेल्या, तरी ते घुबड तिथून गेले नाही.
आ. आम्ही पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांना घडलेले प्रसंग सांगण्यासाठी भ्रमणभाष केला. तेव्हा ते म्हणाले, ‘आज सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना तीन पक्ष्यांच्या रूपात दैवी साक्ष मिळाली ना ?’
इ. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ महर्षींनी सांगितल्याप्रमाणे मंदिरातील शिवासमोर बसून प्रार्थना करत होत्या. त्या वेळी तिथे एक मधमाशी आली आणि ती पुष्कळ वेळ तिथेच होती. थोड्या वेळाने ती चित्रीकरण चालू असलेल्या छायाचित्रकावर जाऊन बसली. हे पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘अगस्ती ॠषींनी मधमाशीच्या रूपात दर्शन दिले.’’
ई. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना महर्षींनी काही घंटे अगोदर मंदिरात जाण्याविषयी सांगितले होते. तेवढ्या अल्प कालावधीतही तेथे जाण्यासाठीची आणि डोंगरावर चढण्यासाठीची डोलीची सोय त्यांच्या कृपेमुळे झाली.
हे सर्व परात्पर गुरु डॉ. आठवले आणि महर्षी यांच्या कृपेनेच साध्य झाले, यासाठी आम्ही सर्व साधक त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), बेंगळुरू, कर्नाटक. (१४.३.२०२०)
(टीप – हे लिखाण महर्षींनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘श्रीचित्शक्ति(सौ.) अंजली गाडगीळ’ असे संबोधण्यापूर्वीचे असल्याने येथे त्यांचा उल्लेख ‘सद्गुरु’ असा केला आहे.)