शासकीय नियमाप्रमाणे रस्त्याची मोजणी करण्यासाठी तहसीलदारांनी दिलेल्या पत्राकडे शेरे (जिल्हा सातारा) ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष !
तहसीलदारांच्या पत्राकडे दुर्लक्ष करणारे नागरिकांच्या तक्रारींची नोंद काय घेत असतील ? अशांना कठोर शिक्षा करायला हवी. – संपादक
कराड, १५ जानेवारी (वार्ता.) – तालुक्यातील शेरे ग्रामपंचायतीच्या सीमेत कराड-तासगाव-शेरे या रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण काढून शासकीय नियमाप्रमाणे रस्त्याची मोजणी करून डागडुजी करावी, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे. या विषयी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. याची नोंद घेत तहसीलदारांनी शेरे ग्रामपंचायतीस शासकीय मोजणी करण्याविषयी पत्र दिले; मात्र या पत्राकडे शेरे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत. (अतिक्रमणाविषयी नागरिकांना निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष का घालत नाही ? – संपादक)
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड-तासगाव-शेरे स्वागत कमान या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आमदार फंडातून १० लाख रुपयांचा निधी दिला आहे; मात्र या रस्त्यावरील अतिक्रमणे न काढता रस्त्याचे काम केले जात आहे. शासकीय नियमाप्रमाणे नकाशात असणार्या रस्त्याचे काम व्हावे, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि शेरे ग्रामपंचायत यांना निवेदन देऊन केली आहे.