वयाच्या ९७ व्या वर्षीही एका जागी स्थिर बसून समष्टीसाठी नामजप करणारे देवीहसोळ (रत्नागिरी) येथील सनातनचे ६५ वे संत पू. जनार्दन कृष्णाजी वागळे (वय १०० वर्षे) !

पू. जनार्दन वागळेआजोबा

१. स्वावलंबी

‘मार्च २०१९ मध्ये पू. वागळेआजोबा आमच्याकडे गोव्याला रहायला आले होते. तेव्हाही त्या वयात (९७ व्या यर्षी) पू. आजोबा स्वतःची कामे स्वतः करत होते, उदा. ते झोपून उठल्यावर स्वतःच्या पांघरुणाची घडी घालून ठेवत असत. त्यांची अंघोळ झाल्यावर ते स्वतःचा टॉवेल स्वतःच वाळत घालत असत. ते स्वतःची औषधे स्वतःच घेत असत.

२. इतरांचा विचार करणे

श्री. विजय लोटलीकर

अ. त्यांना जेवायला बोलावले की, ते लगेच यायचे. त्यातून ‘इतरांचा वेळ जाऊ नये’, असा त्यांचा विचार असायचा.

आ. ‘ते आमच्याकडे गोव्याला रहायला आले असतांना त्यांना थोडे दिवस गावी जाऊन यायचे होते. आम्ही त्यांना म्हटले, ‘‘घरात छोटे बाळ आहे. तुमची अडचण येऊ शकते.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘सूनबाईंनी केवळ स्वयंपाक करून दिला की, झाले. बाकी माझी सर्व कामे मी स्वतः करीन.’’

३. शिकण्याची वृत्ती

एकदा एका देवळातील कार्यक्रमात महाप्रसादामध्ये अळूची भाजी केली होती. त्यामध्ये त्यांनी दही घातले होते. पू. आजोबांनी लगेच त्यांना अळूच्या भाजीत दही घालण्याचा उद्देश विचारून घेतला. पू. आजोबा आम्हाला म्हणाले, ‘‘त्यांच्याकडे आमसूल नव्हते; म्हणून त्यांनी दही घातले होते.’’ यावरून त्यांची निरीक्षणक्षमता आणि शिकण्याची उत्सुकता लक्षात आली.

४. कीर्तनाची आवड

पू. आजोबांना कीर्तन फार आवडते. देवी-देवता यांच्यावरील कीर्तन आणि पुराणातील कथा त्यांना फार आवडतात.

५. अन्नाप्रती असलेला भाव

जेवायला बसल्यावर ते आवश्यक तेवढेच पदार्थ पानात घेतात. ते अन्न वाया घालवत नाहीत; कारण ‘अन्न हा प्रसाद आहे’, असा त्यांचा भाव असतो.

६. व्यष्टी साधना

सौ. संगीता लोटलीकर

पू. आजोबा गोव्याला आमच्या घरी आल्यावरही ते स्वतःचा नामजप नित्यनेमाने करत होते. ते त्यांच्या ठरलेल्या वेळेत त्यांचे नामजप, प्रार्थना, अत्तर आणि कापूर यांचे उपाय नित्यनेमाने करत होते. देवाला गार्‍हाणे घालतो, त्याप्रमाणे ते देवाला प्रार्थना करायचे.

७. समष्टीसाठी नामजप करणे

कु. प्रियांकाने (आताच्या सौ. प्रियांका गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), पू. वागळेआजोबांची नात आणि सौ. संगीता लोटलीकर यांची मुलगी यांनी) रामनाथी आश्रमात पू. आजोबांना सेवा देण्याविषयी कळवले होते. तेव्हा त्यांचे समष्टीसाठी करायच्या नामजपाचे नियोजन करण्यात आले. आरंभी ते समष्टीसाठी २ घंटे नामजप करत. नंतर काही वेळा त्यांना ६ घंटे नामजप करण्याची सेवा मिळायची. तेव्हाही ते आसंदीत बसून, स्थिर राहून आणि न कंटाळता नामजप पूर्ण करत असत.

८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीची असलेली तळमळ !

पू. आजोबा गोव्याला आल्यापासून कोरोना महामारी असल्यामुळे बर्‍याच दिवसांत त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली नव्हती. तेव्हा ते सतत आम्हाला विचारायचे, ‘‘मी नामजप करतो, तो प.पू. गुरुदेवांपर्यंत पोचतो का ? माझी प.पू. गुरुदेवांशी भेट कधी होणार ? माझे काही चुकते का ?’’

एके दिवशी रात्री त्यांना एक भीतीदायक स्वप्न पडले. दुसर्‍या दिवशी सकाळी आमच्या जवळ येऊन ते म्हणाले, ‘‘माझ्यासाठी एवढे करता, तर माझी एकदा प.पू. गुरुदेवांशी भेट घालून द्या.’’ त्यानंतर त्यांचे प.पू. गुरुदेवांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले.’

– श्री. विजय लोटलीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि सौ. संगीता लोटलीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) (पू. वागळेआजोबांचे जावई आणि मुलगी), फोंडा, गोवा. (३१.१२.२०२१)

पू. जनार्दन वागळेआजोबा यांच्या देहात झालेले पालट

सौ. प्रियांका गाडगीळ

हात आणि पाय यांवर चकाकी येणे

पू. आजोबा समष्टीसाठी नामजप करायला लागल्यापासून त्यांचे हात आणि पाय यांवर एक वेगळ्या प्रकारची चकाकी आल्यासारखी दिसते अन् त्यातून प्रकाश बाहेर पडत असल्याचे जाणवते. – सौ. प्रियांका सुयश गाडगीळ (पूर्वाश्रमीच्या कु. प्रियांका लोटलीकर, पू. वागळे आजोबांची नात), (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) डोंबिवली (९.१.२०२२)